ममुराबादजवळ भीषण अपघात; दुचाकीचा चक्काचूर, दोन तरुण गंभीर जखमी

0
3

ललित सोनवणे यांची प्रकृती चिंताजनक; जळगाव–विदगाव रस्त्यावर गतिरोधक बसविण्याची ग्रामस्थांची मागणी

ममुराबाद, प्रतिनिधी : जळगाव–विदगाव रस्त्यावर अपघातांची मालिका सुरूच असून, १० नोव्हेंबर रोजी सायंकाळी सुमारे ५ वाजेच्या सुमारास कृषी विद्यालयाजवळ दुचाकी आणि मारुती अल्टो कार यांच्यात भीषण अपघात झाला. या अपघातात ममुराबाद येथील दोन तरुण गंभीर जखमी झाले असून, ललित विजय सोनवणे (वय २६) यांची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती मिळाली आहे. या घटनेमुळे परिसरात चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, ममुराबाद येथील रहिवासी ललित विजय सोनवणे (वय २६) आणि डिगंबर योगेश कोळी (वय २०) हे दोघे एमएच १९ ईएल १५३१ क्रमांकाच्या दुचाकीने जळगावहून ममुराबादकडे येत होते. याचवेळी ममुराबादकडून जळगावच्या दिशेने भरधाव वेगाने जाणाऱ्या एमएच १९ एएक्स ५२९२ क्रमांकाच्या मारुती अल्टो कारने त्यांच्या दुचाकीला जोरदार धडक दिली. धडक इतकी भीषण होती की, दुचाकीचा अक्षरशः चक्काचूर झाला.

अपघातानंतर दोन्ही तरुण रस्त्यावर गंभीर जखमी अवस्थेत पडले होते. त्याचवेळी ममुराबाद येथील समाधान पाटील हे आपली मालवाहतूक गाडी घेऊन घरी जात असताना त्यांच्या निदर्शनास हा अपघात आला. त्यांनी क्षणाचाही विलंब न करता दोन्ही जखमींना आपल्या वाहनातून जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल केले. दोघांच्याही डोक्याला गंभीर दुखापत झाल्याने प्राथमिक उपचारानंतर त्यांना तातडीने खासगी रुग्णालयात हलविण्यात आले. यामध्ये ललित सोनवणे यांची प्रकृती चिंताजनक असल्याचे समजते.

दरम्यान, घटनेची माहिती मिळताच तालुका पोलिसांनी जिल्हा सामान्य रुग्णालयात धाव घेऊन अपघाताची चौकशी केली. उशिरापर्यंत या प्रकरणी गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती.

जळगाव–विदगाव रस्ता अपघातांचे केंद्र?

जळगाव–विदगाव रस्त्याचे काँक्रिटीकरण झाल्यापासून या मार्गावर वारंवार अपघात घडत असल्याचा आरोप ग्रामस्थांकडून केला जात आहे. एक दिवसाआड अपघात घडत असल्याने वाहनचालक आणि स्थानिक नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. रस्त्यावरील वाहनांचा वेग नियंत्रित करण्यासाठी आवश्यक उपाययोजना करण्यात याव्यात, अशी मागणी जोर धरत आहे.

प्रजापत नगर, बायपास रोड, कृषी विद्यालय परिसर, म्हाळसादेवी, रेणुका माता मंदिर, ममुराबाद तसेच विदगाव या ठिकाणी तातडीने गतिरोधक (स्पीड ब्रेकर) बसविण्यात यावेत, अशी मागणी ग्रामस्थांकडून करण्यात येत आहे.

वारंवार होणारे अपघात रोखण्यासाठी संबंधित प्रशासनाने या मागणीची गांभीर्याने दखल घेऊन तातडीने उपाययोजना कराव्यात, अशी अपेक्षा परिसरातील नागरिक व्यक्त करीत आहेत.

Spread the love