प्रतिनिधी – जितेंद्र काटे
भुसावळ – वाघुर धरणाच्या कालव्यातून खरीप हंगामात आवर्तन सोडण्यात यावे यासाठी शेतकऱ्यांना संघर्ष करावा लागला आणि पाणी सोडण्यात आल्याने कपाशी व मका लावून धुळ पेरणी केली मात्र अचानक शासनाने कालव्यातून आवर्तन बंद केले त्यामुळे शेतकरी हवालदिल झाले आहेत.
या बाबत माहिती अशी की , वाघूर धरणाच्या उजव्या व डाव्या कालव्यातून खरीप हंगामासाठी आवर्तन सोडण्यात आले होते. डाव्या कालव्यातून रब्बी व खरीप पिकांसाठी वेळोवेळी आवर्तन सोडण्यात आले होते मात्र यंदा वाघुर धरणाच्या उजव्या कालव्यातून कालवा दुरुस्ती च्या नावाखाली रब्बी हंगामात पाणी सोडण्यात आले नाही तसेच मे महिन्यापासून खरीप पिकांसाठी आवर्तन सोडण्यात यावे ही मागणी केली जात होती. त्यामुळे ८ जून रोजी दुपारी वाघुर धरणाच्या उजव्या कालव्यातून ३० क्युसेस पाणी सोडण्यात आले होते.कालव्याला पाणी सोडण्यात आल्याने आनंदी होऊन शेतकऱ्यांनी कपाशी , मका अशी पिकांची धुळ पेरणी केली मात्र अचानक पिण्याच्या पाण्याचा राखीव साठा म्हणून आवर्तन बंद करण्यात आले त्यामुळे शेतकरी अक्षरशः हवालदिल झाला आहे.उजव्या कालव्यावर अवलंबून असलेले वराडसीम , बेलव्हाळ, सुनसगाव , गोजोरे, गोंभी, मिरगव्हाण , वांजोळा , साकेगाव या परिसरातील शेतकऱ्यांनी महागडी बियाणे शेतात टाकून दिली आहेत आणि आता काय करावे असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.
महाराष्ट्र शासनाच्या जलसंपदा विभागाने दि.१३ जून रोजी पत्रक काढले असून एल निनो चे कारण देत ३१ ऑगस्ट पर्यंत पिण्याच्या पाण्याचा साठा सुनिश्चित करण्यासाठी सिंचनासाठी सोडलेला पाणी पुरवठा तात्काळ बंद करण्यात यावा असे सांगितले आहे . वास्तविक पाहता वाघुर धरणात मुबलक पाणी साठा आहे त्यामुळे शेतकऱ्यांना हंगामासाठी आवर्तन सोडण्यास काहीच हरकत नाही असे सुज्ञ शेतकऱ्यांचे म्हणणे आहे मात्र ” सत्तेपुढे शहाणपण चालत नाही ” ही म्हण खरी करण्याचा प्रयत्न शासनाचा दिसत असल्याची चर्चा सुरू आहे.












