‘ कलकत्ता ‘ बौद्ध धर्माच्या पुनर्स्थापनेचे मुख्यकेंद्र

0
2

पाल वंशीय साम्राज्य बंगालमध्ये साधारणतः ७ व्या शतकात प्रस्थापित झाले . पाल वंशीय राजे बौद्ध धर्मीय ( महायानी ) राजे होते त्यांनी बंगाल मध्ये बौद्ध धर्माचा मोठयाप्रमाणात प्रचार केला . विविध वीहारांची स्थापना केली , नालंदा , तक्षशिला विद्यापीठांचे संरक्षण केले , शिक्षणाचा मोठा प्रचार केला . या वंशातील धर्मपाल या राजाने तिबेट , दक्षिण पूर्व आशिया मध्ये बौद्ध धर्माचे मोठे कार्य केले . बौद्ध धर्माच्या प्रचार प्रसाराचे सर्वाधिक कार्य या वंशातील धर्मपाल यांनीच केल्याची नोंद आहे . या राजाने मुळ बौद्ध साहित्य मोठयाप्रमाणात गोळा करून त्याचे जतन केले . बहुतांश मुळ बौद्ध साहित्य त्याने तिबेट येथे संरक्षित केले .

पाल वंशातील राजा रामपाल याचा सेना वंश कडून सन ११६१ मध्ये पराभव करण्यात आला . बंगाल मध्ये सेना वंशाचे साम्राज्य प्रस्थापित झाल्याने त्यांनी पाल वंशीय राजा रामपाल व त्याच्या सर्व सैन्याला हाकलून लावले व पाल वंशाचे साम्राज्य नष्ट केले . सेनावंशीय हे गैर बौद्ध धर्मीय राजे असल्याने त्यांनी बंगाल मधून बौद्ध धर्माचा ऱ्हास केला . १२ व्या शतकात भारतातून बौद्ध धर्म पूर्णतः हद्दपार झाला . सेना वंशाच्या साम्राज्याला मुस्लिम आक्रमकांनी नष्ट करून त्यांचे साम्राज्य प्रस्थापित केले. बंगालच्या संपूर्ण इतिहासात पाल साम्राज्यास ‘ सुवर्ण युग ‘ म्हणून ओळखले जाते.

सम्राट अशोक तसेच पाल साम्राज्यात कलकत्ता ( आताचे कोलकाता ) शहर नव्हते , मात्र कलकत्ता शहराचा आताचा जो भाग आहे हा १२ व्या शतकापर्यंत अतिशय दलदलीचा होता . कलकत्ता शहराची स्थापना ईस्ट इंडिया कंपनीचे प्रशासक जॉब चार्नोक यांनी सन १६९० ला सुतानुती , गोविंदपुर व कालिकाता या तीन गावांना मिळून एक कलकत्ता हे शहर वसविले . अर्थात २००३ मध्ये कलकत्ता ऊच्य न्यायलयाने जॉब यांना हे श्रेय देण्यास नकार दिला आहे . कलकत्ता शहराच्या निर्मितीचा इतिहास काही असो , पण हे शहर झपाट्याने विकसित होत गेले व बंगालची ‘ सांस्कृतिक राजधानी ‘ म्हणून नावलौकिक मिळविला . हे शहर आता पश्चिम बंगालची राजधानी आहे . इथं ६० टक्के साक्षरतेचे प्रमाण आहे . २ विद्यापीठ व अनेक शाळा, महाविद्यालये आहेत .

१२ व्या शतकापासून भारतातून हद्दपार झालेल्या बौद्ध धर्माची पुनर्स्थापना १९ व्या शतकाच्या प्रारंभी होऊ लागली . त्याआधी सर विल्यम जोन्स यांनी दिनांक १५ जानेवारी १७८४ रोजी कलकत्ता येथे ‘ एशियाटिक सोसायटी ‘ ची स्थापना करून भारतातील ऐतिहासिक व प्राचीन अवशेषांचा अभ्यास सुरू केला . लेफ्टनंट अलेक्झांडर कानिंग ह्याम यांनी सन १८३४ पासून उत्खननास प्रारंभ केला . सन १८६१ ला ब्रिटिश सरकारने ‘ भारतीय पुरातत्व सर्वेक्षण ‘ या विभागाची स्थापना करून त्याचे पहिले संग्रहालय कलकत्ता येथे सुरू केले . या माध्यमातून ब्रिटिशांनी अनेक ठिकाणी उत्खनन केले व त्यात त्यांना बौद्ध धर्माचे अवशेष मिळत गेले . यातून बौद्ध साहित्य व त्याचा इतिहास पुढं आला . यातूनच विविध बौद्ध राजांनी भारतास भेटी दिल्या व बौद्ध स्थळांच्या विकासार्थ ब्रिटिशांना सहकार्य केले .

भगवान बुध्द यांना जिथं ज्ञानप्राप्ती झाली तिथं सम्राट अशोक यांनी उभारलेल्या विहाराचा शोध लागल्याने जगभरातील बौद्ध जनतेच्या आकर्षणाचे केंद्रबिंदू गया ( बोधगया ) झाले . त्या विहाराला भेटी देण्या करिता देश विदेशातून लोक येऊ लागले . बुद्ध विहाराचा शोध लागल्या नंतर त्यावर तिथल्या महंत लोकांनी ताबा मिळविला मात्र त्यांनी तिथं कोणत्याही सुधारणा केल्या नाही त्यामुळे महावीहाराची अत्यंत दुरावस्था होत गेली .

भगवान बुध्द यांना ज्या ठिकाणी ज्ञानप्राप्ती झाली त्या ठिकाणी ( महाबोधी महाविहार ) भेट देण्याकरिता सिलोन येथून अनागरिक धम्मपाल सन १८९१ मध्ये आले . त्या महाविहाराची एकूण दुरावस्था पाहून ते रडले व त्यांनी तिथल्या व्यवस्थापनाशी ( महंत लोकांशी ) संपर्क साधला व ‘ हे विहार बौद्ध धर्मियांचे असल्याने ते आमच्या ताब्यात द्या ‘ म्हणून मागणी केली . महंत लोकांनी त्यांना तिथून हुसकावून लावले , त्यांना मारहाण केली . तरीसुद्धा धम्मपाल तिथेच राहून आपले कार्य करू लागले तेंव्हा महंत लोकांनी अतिशय आक्रमक पद्धतीने त्यांना मारहाण केली व गयातून हाकलून दिले. तेंव्हा धम्मपाल कलकत्ता येथे येतात व तिथून आपल्या चळवळीचे सूत्र हलवतात .

पाल राजवटी नंतर धम्मपाल या भागात बौद्ध धर्माच्या प्रचार , प्रसाराचे कार्य सुरू करतात . १८९२ मध्ये ते कलकत्ता येथे येतात . महाबोधी सोसायटीचे मुख्यालय २२/१ , गंगाधर बाबू लेन , बो बाजार , कलकत्ता येथे सुरू करतात . इथेच ते ‘ द महाबोधी ‘ मासिकाची सुरवात करतात . १८९३ मध्ये महाबोधी सोसायटी , कलकत्ता ची ते अधिकृत स्थापना करतात . बोधगया येथील महाबोधी महाविहार मुक्ती आंदोलन सुरू करतात . १८९३ ला अमेरिकेतील जागतिक सर्वधर्म परिषदेत भाग घेऊन अमेरिकेतील काही भागांमध्ये बौद्ध धर्मावर प्रवचन देतात . भारतात विविध प्राचीन बौद्ध विहारांचा जीर्णोद्धार करतात . नवीन बौद्ध विहारं बांधतात . त्यांना इथं जनाश्रय मिळतो . भगवान बुद्ध यांचे शिष्य सारिपुत्त , महमोग्गलायन यांच्या अस्थी ते मिळवतात . ( या अस्थी आता सांची येथील बुद्ध विहारात आहे . ) कलकत्ता येथील कॉलेज स्ट्रीट परिसरात भव्य बुद्ध विहाराची उभारणी करतात त्या विहारात भगवान बुध्द यांचा एक दात सुरक्षितरित्या ठेवतात . भारतातील बौद्ध चळवळीचा , भारतातील बौद्ध धर्माच्या पुनर्स्थापनेचा पाया ते इथूनच रचतात .

भंते चंद्रमणी ( महास्थविर चंद्रमणी ) सन १८९१ मध्ये म्यानमार मधून कलकत्ता येथे बौद्ध धर्माचा प्रचार, प्रसार करण्या करिता येतात . १८९२ ला ते बोधगया येथील महाबोधी महाविहारात जाऊन त्या स्थळाची पाहणी करतात . तिथं त्यांना मारहाण होते तेंव्हा पुन्हा कलकत्ता येथे येतात . इथ एका बर्मी बुद्ध विहाराची उभारणी करतात . सारनाथ , कुशिनगर इथ विविध प्रकारची कामं करतात पुढं ते कुशीनगर येथे स्थाईक होतात . काही बौद्ध ग्रंथ लिहतात , डॉ. राहुल सांकृत्यायन , डॉ. भदंत आनंद कौसाल्यायन यांचे मार्गदर्शक ठरतात . १४ ऑक्टोबर १९५६ रोजी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विनंतीवरून नागपूर येथील धर्मांतर सोहळ्यास उपस्थित राहून डॉ. बाबासाहेब आंबेडकर व माईसाहेब आंबेडकर यांना बौद्ध धर्माची दीक्षा देतात .

अनागरिक धम्मपाल , महास्थविर चंद्रमणी यांच्या कार्यांनी प्रभावित होऊन ५ ऑक्टोबर १८९२ ला वेन. कृपाशरण महास्थविर हे भारतात व प्रामुख्याने बंगाल मध्ये बौद्ध धर्माची पुनर्स्थापना करण्याच्या मुख्य उद्येशाने ‘ बंगाल बुद्धिस्ट असोसियेशन ‘ ची स्थापना करतात. भारतभरात ते याकरिता विविध सांस्कृतिक कार्यक्रम घेतात . कलकत्ता येथे १९०३ ला ‘ धर्मांकुर बुद्ध विहार ‘ ची निर्मिती करतात . हे विहार अतिशय भव्य स्वरूपाचे आहे . बौद्ध धर्माचा जागतिक पातळीवर प्रचार करण्याच्या उद्देशाने सन १९०८ ला ते ‘ जगज्योती ‘ या मासिकाची सुरवात करतात . हे मासिक आजही सुरू आहे . त्यांच्या प्रयत्नांनी बंगाल मध्ये बौद्धांची धार्मिक चळवळ चांगल्या प्रकारे सुरू आहे .

प्रसिद्ध बौद्ध विचारवंत व सिलोन येथे जाऊन बौद्ध भिख्खू झालेले धर्मानंद कोसंबी हे कलकत्ता येथील नॅशनल कॉलेज , कलकत्ता विद्यापिठात जाऊन पाली भाषा , बौद्ध तत्त्वज्ञान यांचा गहन अभ्यास करतात . पाली भाषा , बौद्ध तत्त्वज्ञान या विषयी ग्रंथ निर्मिती करतात पुढं १९०५ ला ते कलकत्ता येथील नॅशनल कॉलेज मध्ये पाली भाषेचे प्राध्यापक म्हणून रुजू होतात . पाली विषयाचे भारतातील पहिले प्राध्यापक म्हणून त्यांची नोंद होते . आज कलकत्ता व बंगाल मध्ये पाली विषयाच्या विद्यार्थ्यांची संख्या तशी तुलनेने चांगली असून बंगाल मधील विविध विद्यापीठांमध्ये बौद्ध तत्त्वज्ञान अभ्यासक्रमास आहे .

सन १९२८ मध्ये म्यानमार येथून यू सान मिन हे कलकत्ता येथे येतात , बौद्ध धर्माचा प्रचार करतात व १० इडन हॉस्पिटल रोड येथे एक बुद्ध विहार निर्माण करतात .

तिबेट येथील अक्का दोरजी हे बौद्ध भिख्खू या शहरात १९३० मध्ये येतात तेही इथं तिबेटी संस्कृतीचे बुद्ध विहार निर्माण करतात . एक मठ चालवतात . ह्युयान स्यांग मठाची इथं स्थापना केली जाते . हा मठ पश्चिम चौबाग येथे असून बौद्ध कलेचा एक अद्भुत नमुना असून तो एक अमोल ठेवा आहे .

जपान येथून नीची दात्सू फुजी नावाचे बौद्ध भिक्खू सन १९३५ मध्ये कलकत्ता येथे येतात . लेक रोड , ठाकूरिया तलाव जवळ ते अत्यंत भव्य स्वरूपाचे बुद्ध विहार निर्माण करतात . या विहारास सोनेरी कडा असून अत्यंत पांढऱ्या शुभ्र रंगाची इमारत आहे .

‘ भगवान बुद्ध यांचा प्रकाश प्रत्येकाच्या अंतकरणात पोहचविण्याचे ‘ मुख्य उद्दिष्ट ठेऊन व्हीनेरेबल मास्टर सिंग यून यांनी दिनांक ०३ फेब्रुवारी १९९१ रोजी ‘ बुद्धा लाईट इंटरनॅशनल ‘ या संस्थेची स्थापना केली . या संस्थे मार्फत कलकत्ता येथील न्यू टांगरा रोड येथे फो ग्वान शान बुद्ध विहार १९९८ ला बांधले गेले . या विहारात भगवान बुद्ध यांची सोन्याची अत्यंत मनमोहक मूर्ती आहे . फारमोठ्याप्रमाणात बौद्ध ग्रंथ इथ आहेत . भिक्खूणी मियाओ यांनी या करिता विशेष परिश्रम घेतले आहेत . या विहारात खाण्याचे विविध पदार्थ सुद्धा मिळतात .

कलकत्ता शहरात या व्यतिरिक्त काही बुद्ध विहार , मठ , प्रेक्षणीय बौद्ध स्थळं आहेत . १२ व्या शतका पासून भारतातून लुप्त झालेला बौद्ध धर्म भारतात नव्याने जो उदयास आला त्याची सुरावात कलकत्ता ( कोलकाता ) या शहरा पासून झाली असून आज संपूर्ण भारतात तो कमी अधिक प्रमाणात दिसत आहे . भारतात आजही बौद्ध धर्माची माणसं लोकसंख्येने अत्यल्प असतील मात्र बौद्ध अनुयायी , बुद्ध विहारं , बौद्ध स्थळं , बौद्ध भिक्खू , बौद्ध धर्माच्या प्रचार , प्रसार करणाऱ्या संस्था , संघटना मोठ्या प्रमाणात आहेत . भारतात आज बौद्ध धर्माला जनाश्रय व संविधानाच्या माध्यमातून राजाश्रय लाभला आहे . या सर्व घडामोडीत कलकत्ता शहराचे अनन्य साधारण महत्त्व आहे.

 

Spread the love