प्रतिनिधी – जितेंद्र काटे
भुसावळ – जिद्द, चिकाटी आणि कठोर परिश्रमाच्या जोरावर ग्रामीण व शहरी भागातील तरुण आंतरराष्ट्रीय स्तरावर आपल्या नावाचा ठसा उमटवत आहेत. याच दैदिप्यमान यशाची परंपरा जपत निखिल नरेंद्र गांधेले याने ‘बॅचलर ऑफ इकॉनॉमिक अँड कॉम्प्युटर डाटा सायन्स’ शिक्षणासाठी थेट इटली (Italy) या देशात झेप घेतली आहे.
निखिलने कठीण आंतरराष्ट्रीय स्पर्धा परीक्षा [ IELTS -8(9) band ,
TOLC -42(50) ] यशस्वीरीत्या उत्तीर्ण करत १००% स्कॉलरशिप (Full Scholarship) पटकावली असून, त्याची इटलीतील प्रसिद्ध ‘युनिव्हर्सिटी ऑफ कॅसिनो अँड सदर्न लॅझिओ’ (University of Cassino & Southern Lazio) येथे ‘बॅचलर ऑफ इकॉनॉमिक अँड कॉम्प्युटर डाटा सायन्स’ या अभ्यासक्रमासाठी निवड झाली आहे.
यशाचा प्रवास आणि कौटुंबिक पार्श्वभूमी:
निखिल हा कुऱ्हा पानाचे येथील श्री. सुभाष वामन गांधेले यांचा नातू आहे. त्यांनी आयुष्यभर शेतीत राबत, घाम गाळून कुटुंबाचा उदर निर्वाह केला. मुलांना शिकवले. लहान मुलगा श्री. योगेश सुभाष गांधेले शिक्षक झाला. तर त्यांचा मोठा मुलगा श्री. नरेंद्र सुभाष गांधेले MSEB मध्ये इंजिनियर झाला. श्री. नरेंद्र सुभाष गांधेले यांचा सुपुत्र निखिलने १२ वीच्या शिक्षणानंतर अतिशय कमी वयात आंतरराष्ट्रीय स्तरावरील अत्यंत आव्हानात्मक परीक्षांमध्ये उत्तम यश संपादन केले. अभ्यासातील सातत्य, कुशाग्र बुद्धिमत्ता आणि तंत्रज्ञानाची आवड याच्या बळावर त्याने हे उत्तुंग यश मिळवले आहे.
१२ वीनंतर थेट परदेशात, तेही पूर्ण शिष्यवृत्तीसह उच्च शिक्षणाची संधी मिळवणे ही केवळ गांधेले कुटुंबासाठीच नव्हे, तर संपूर्ण मित्र परिवार व समाजासाठी अत्यंत अभिमानाची बाब ठरली आहे. “स्वप्नांवर आणि स्वतःच्या मेहनतीवर विश्वास ठेवला तर कोणतेही ध्येय अशक्य नाही,” हेच निखिलने आपल्या यशातून सिद्ध करून दाखवले आहे.
निखिलच्या या गगनभरारीबद्दल त्याचे सर्व स्तरातून कौतुक होत असून, इटलीतील त्याच्या पुढील शैक्षणिक प्रवासासाठी आणि उज्ज्वल भविष्यासाठी नातेवाईक, शिक्षक व मित्र परिवाराकडून त्याच्यावर शुभेच्छांचा वर्षाव केला जात आहे.












