मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री आज जळगावत; जिल्हाधिकाऱ्यांची माहिती

0
49

जळगाव –‘शासन आपल्या दारी’ उपक्रमांतर्गत मंगळवारी (ता. २७) मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस जळगाव शहरात येत आहेत. हा कार्यक्रम पोलिस कवायत मैदानावर दुपारी तीनला होईल.

कार्यक्रमाची तयारी पूर्ण झाली आहे. पाऊस आला, तरी किमान ७५ हजार नागरिक बसू शकतील, अशा वॉटरप्रूफ मंडपाची व्यवस्था करण्यात आल्याची माहिती जिल्हाधिकारी अमन मित्तल यांनी सोमवारी (ता. २६) झालेल्या पत्रकार परिषदेत दिली.

पत्रकार परिषदेस पोलिस अधीक्षक एम. राजकुमार, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. पंकज आशिया उपस्थित होते. ‘शासन आपल्या दारी’ उपक्रमांतर्गत शासनाच्या विविध योजना नागरिकांपर्यंत पोचून त्यांनी त्याचा लाभ घ्यावा, असा कार्यक्रमाचा उद्देश आहे.

आरोग्य तपासणीसह रक्तदान शिबिर

कार्यक्रमस्थळी पोलिस कवायत मैदानावर मोठे मंडप उभारले आहेत. सकाळी साडेआठपासून विविध कार्यक्रम सुरू होतील. सकाळी साडेआठला आरोग्य तपासणी शिबिर, रक्तदान शिबिर सुरू होईल.

नूतन मराठा महाविद्यालयात रोजगार मेळावा सुरू राहील. दुपारी कार्यक्रमस्थळी सांस्कृतिक कार्यक्रम सुरू होतील. मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री दुपारी अडीचला जळगाव विमानतळावर पोचतील. तीनला कार्यक्रम सुरू होईल. दोघांचे स्वागत केळीपासून तयार केलेल्या बिस्कीट, लाडू, चिप्स बास्केट देऊन होईल. सोबत केळी, भरिताची वांगीही असतील.

विविध स्टॉल्स

कार्यक्रमाठिकाणी शासकीय योजनांची माहिती देणारे विविध स्टॉल लावण्यात येतील. नागरिकांनी या स्टॉलला भेट देऊन योजनांच्या लाभासाठी अर्ज करण्याचे आवाहन जिल्हाधिकारी मित्तल यांनी केले.

तक्रार निवारण कक्षही

अनेकांना मुख्यमंत्र्यांकडे तक्रारी करायच्या असतात. मात्र त्यांना मुख्यमंत्र्यांकडे जाता येत नाही, अशा नागरिकांसाठी तक्रार निवारण कक्ष असणार आहे. त्यात नागरिकांच्या तक्रारी घेऊन त्यांना टोकन क्रमांक दिला जाईल. त्या तक्रारी मुंबईत मंत्रालयात पाठविल्या जातील.

दहा लाभार्थ्यांना मंत्र्यांच्या हस्ते लाभ

दहा शासकीय विभागातील लाभार्थ्यांना मुख्यमंत्री शिंदे व उपमुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते लाभ दिले जातील. यात महसूल, कृषी, संजय गांधी योजना, रेशनकार्ड, जातीचे दाखले आदींचा समावेश असेल.

Spread the love