जळगावात विकासकामांचे कार्यादेश रखडले; शिवसेनेच्या नगरसेविकेचा प्रशासनाला १५ दिवसांचा अल्टिमेटम!

0
2

जळगाव | प्रतिनिधी

जळगाव शहरातील मंजूर विकासकामांचे कार्यादेश देण्यास होत असलेल्या विलंबामुळे आता राजकीय वातावरण तापण्याची चिन्हे दिसत आहेत. नियमानुसार अर्थसंकल्पात तरतूद मंजूर होऊन निविदा प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतरही विकासकामांचे कार्यादेश जाणीवपूर्वक रोखून धरले जात असल्याचा आरोप शिवसेनेच्या नगरसेविका उज्ज्वला बाविस्कर यांनी केला आहे. प्रशासनाने येत्या १५ दिवसांत योग्य ती कार्यवाही न केल्यास नागरिकांसह रस्त्यावर उतरून आंदोलन किंवा उपोषण करण्याचा इशाराही त्यांनी दिला आहे.

प्रभाग क्रमांक २ (ब) मधील कांचन नगर, शिवाजी नगर परिसरातील १३ विकासकामांची निविदा प्रक्रिया पूर्ण होऊन सुमारे चार महिने उलटले आहेत. मात्र, अद्याप या कामांचे कार्यादेश देण्यात आलेले नसल्याने परिसरातील विकासकामे रखडल्याचे चित्र आहे.

या प्रस्तावित कामांमध्ये पेव्हर ब्लॉक बसविणे, अमृत पाणीपुरवठा पाइपलाइनच्या चारी बुजविणे तसेच रस्त्यांचे काँक्रिटीकरण आदी महत्त्वाच्या कामांचा समावेश आहे. या कामांना प्रशासकीय मान्यता आणि निविदा प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतरही प्रत्यक्ष कामाला सुरुवात होत नसल्याने नागरिकांना अडचणींचा सामना करावा लागत असल्याचा मुद्दा उपस्थित केला जात आहे.

प्रशासनाच्या भूमिकेकडे लक्ष

मंजूर कामांचे कार्यादेश नेमके कोणत्या कारणामुळे रखडले आहेत, असा सवाल उपस्थित होत आहे. संबंधित विभागाने याबाबत स्पष्ट भूमिका घेऊन प्रलंबित कार्यादेश तातडीने द्यावेत, अशी मागणी नगरसेविका उज्ज्वला बाविस्कर यांनी केली आहे.

आता प्रशासन या इशाऱ्याची कितपत दखल घेते आणि येत्या १५ दिवसांत कार्यादेशाबाबत निर्णय होतो का, याकडे कांचन नगर व शिवाजी नगर परिसरातील नागरिकांचे लक्ष लागले आहे.

Spread the love