प्रतिनिधी – जितेंद्र काटे
भुसावळ – सध्या सर्वत्र दुष्काळजन्य परिस्थिती निर्माण झाली असल्याने शासनाने दखल घेऊन राज्यात अनेक जिल्ह्यांमध्ये दुष्काळ जाहीर केला आहे. विशेष म्हणजे ठिकठिकाणी शासकीय अधिकारी व मंत्री व लोकप्रतिनिधी यांनी दुष्काळी परिस्थितीवर मात करण्यासाठी नागरिकांना धिर देत पाणी जपून वापरण्याचं आवाहन केले आहे मात्र तालुक्यातील सुनसगाव येथील कोल्हापूर टाईप ( के टी वेअर ) बंधाऱ्यातून दररोज लाखो लिटर पाणी वाहून जात असल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे.
या बाबत माहिती अशी की , सुनसगाव येथे पाच नंबर शिवाराला लागून माजी आमदार दिलीप भोळे यांच्या काळात वाघुर नदीवर कोल्हापूर टाईप बंधारा बांधण्यात आला आहे. याच ठिकाणी ऑक्टोबर महिन्यात लोखंडी गेट टाकून पाणी अडविण्यात येत होते मात्र सर्व लोखंडी गेट चोरीला गेले आहेत. याच बंधाऱ्याला खा.रक्षाताई खडसे यांच्या निधीतून सिमेंट भिंत बांधण्यात आली होती.या बंधाऱ्यात अडविण्यात आलेल्या पाण्यामुळे या परिसरात शेतीला काहीशा प्रमाणात फायदा झाल्याने आणि मुख्यतः पिण्याच्या पाण्याचा प्रश्न मार्गी लागला आहे. या बंधाऱ्यात साचणाऱ्या पाण्यामुळे बेळी , नशिराबाद, बेलव्हाळ येथील शेतकऱ्यांना फायदा झाला आहे. एवढा महत्त्वाचा हा बंधारा असून देखील शासनाने कायम या बंधाऱ्या कडे दुर्लक्ष केले आहे. काही वर्षांपूर्वी वाघुर नदीला महापूर आला होता तेव्हा बंधाऱ्याच्या डाव्या बाजूला भगदाड पडल्याने के टी वेअर चे मोठे नुकसान झाले होते तेव्हा पासून म्हणजे गेल्या चार वर्षांपासून या के टी वेअर ला पडलेल्या भगदाडा मधून आजतागायत लाखो लिटर पाणी वाहून जात आहे. या बाबत संबंधित अधिकारी यांच्याकडे कोणीही तक्रार दाखल करीत नसल्याने पाण्याचा प्रवाह सुरुच आहे.
वास्तविक पाहता आता सध्या दुष्काळ जाहीर झाला आहे त्यामुळे भविष्यात पिण्याच्या पाण्याचा प्रश्न उपस्थित होऊ नये म्हणून पाणी साठवणे गरजेचे आहे परंतु सुनसगाव के टी वेअर बंधाऱ्यातून वाहून जाणारे पाणी अडविण्यासाठी संबंधित अधिकारी यांनी तातडीने लक्ष देणे गरजेचे असून बंधाऱ्याला पडलेले भगदाड तात्काळ बुजवण्यात यावे अशी मागणी केली जात आहे.
नुकतेच काही दिवसांपूर्वी नशिराबाद नगरपरिषदेच्या कर्मचाऱ्यांची या ठिकाणी दगडांनी व थैल्यांमध्ये वाळू भरुन पाणी अडविण्यासाठी प्रयत्न केला होता परंतु तरीही पाणी वाहून जाताना दिसत आहे.
***** जिल्हा परिषद पाणी सिंचन विभागाच्या अधिकाऱ्यांनी लक्ष देऊन या बंधाऱ्यात पाणी वाहून न जाता कसे साठवता येईल या साठी प्रयत्न केले तर पाणी साठवण होऊ शकते.
लालचंद पाटील
माजी उपाध्यक्ष
जिल्हा परिषद जळगाव
सुनसगाव के टी वेअर मध्ये उजव्या बाजूला मोठ्या प्रमाणात भराव आहे.तो भराव काढला तर बंधारा खोल होईल आणि पाण्याचा मुबलक प्रमाणात साठा होईल. त्यासाठी ग्रामपंचायतीने पुढाकार घेऊन बंधाऱ्यात साचलेल्या वाळूचा उपसा करावा.
मनिषा भालचंद्र पाटील
माजी सभापती
पंचायत समिती भुसावळ










