पंतप्रधान मोदींना लोकमान्य टिळक पुरस्कार जाहीर

0
13

पंतप्रधान नरेंद्र मोदींना यावर्षीचा लोकमान्य टिळक स्मारक ट्रस्टच्या वतीने देण्यात येणारा पुरस्कार जाहीर झाला आहे. टिळक स्मारक ट्रस्टचे विश्‍वस्त डॉ. रोहित टिळक यांनी या पुरस्काराची घोषणा केली.

या कार्यक्रमाला राष्ट्रवादीचे नेते शरद पवार यांची प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थिती असणार आहे. परंतू गेल्या आठवड्यातच एनसीपीत झालेल्या फुटीनंतर पवार-मोदी प्रथमच एकाच व्यासपीठावर उपस्थित राहणार आहे. त्यामुळे खरच हे मान्यवर एकत्र येतील का, यावर राजकीय वर्तुळात चर्चा रंगली आहे.

ट्रस्टचे विश्‍वस्त रोहित टिळक म्हणाले की, मंगळवारी 1 ऑगस्ट रोजी लोकमान्य टिळक यांची 103 वी पुण्यतिथी आहे. या निमित्त पुण्यात टिळक महाराष्ट्र विद्यापीठाच्या प्रांगणात होणार्‍या सोहळ्यात मोदी यांना या पुरस्काराने गौरविले जाणार आहे. दीपक टिळक यांच्या हस्ते हा पुरस्कार मोदींना दिला जाणार आहे. पुरस्काराचे यंदाचे 41 वे वर्ष आहे. पंतप्रधान मोदी यांच्या नेतृत्वाखाली आत्मनिर्भर भारत या संकल्पनेअंतर्गत देशाने प्रगतीची नवी शिखरे सर केली आहेत. देशवासीयांमध्ये त्यांनी राष्ट्रप्रेमाची भावना जागृत करुन देशाला जागितक पटलावर महत्त्वाचे स्थान मिळवून दिले आहे. या कार्यासाठी ट्रस्टच्या विश्‍वस्तांनी मोदींच्या नावाची या पुरस्कारासाठी एकमताने निवड केली आहे. या सोहळ्यासाठी प्रमुख पाहुणे म्हणून ज्येष्ठ नेते शरद पवार यांना निमंत्रित करण्यात आल्याचे रोहित टिळक यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.

Spread the love