जळगाव – जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या बद्दल अज्ञात व्यक्तीने फेसबुक वरून आक्षेपार्ह पोस्ट टाकून बदनामी केल्याची धक्कादायक प्रकारसमोर आला आहे.
याप्रकरणी बुधवारी एमआयडीसी पोलीस ठाण्यात अज्ञात व्यक्तीविरोधात अदखलपात्र गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मिळालेली माहिती अशी की, एका अज्ञात व्यक्तीने फेसबुकवर शिवसेना जळगाव ग्रामीण नावाचे पेज तयार करून ७ एप्रिल ते २५ जुलै २०२३ दरम्यान पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्याबद्दल वेळोवेळी आक्षेपार्ह पोस्ट टाकून बदनामी केल्याचे समोर आले. संबंधित व्यक्तीने फेसबुक पेजवर कोणतीही सहीनिशा न करता वेगवेगळ्या पोस्ट टाकून बदनामी करून त्रास देण्याचा प्रयत्न केला आहे. दरम्यान समाज सेवक गणेश सोनवणे यांनी बुधवारी २६ जुलै रोजी दुपारी ४ वाजता एमआयडीसी पोलीस ठाण्यात तक्रार दिली. त्यानुसार अज्ञात व्यक्तीविरोधात एमआयडीसी पोलीस ठाण्यात अदखलपात्र गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक दत्तात्रय पोटे करीत आहे.












