जळगाव – जिल्हाधिकारी कार्यालयाजवळील रस्त्यावर पडलेल्या खड्ड्यांचे तरुणांनी पूजन केल्यावर महापालिकेने शुक्रवारी (ता. २८) तत्परता दाखवून या खड्ड्यांची तातडीने दुरुस्ती केली.
शहरातील रस्त्यांवर पडलेल्या खड्ड्यांची समस्या गंभीर आहे. त्याबाबत आता विविध स्तरांवर आंदोलनेही सुरू आहेत. शहरातील तरुणांनी एकत्र येऊन गुरुवारी (ता. २७) आंदोलन केले होते.
तरुणांनी जिल्हाधिकारी कार्यालय रस्त्यावर पडलेल्या एका खड्ड्याचे हळद-कुंकू वाहून पूजन करून महापालिकेने तातडीने या रस्त्याची दुरुस्ती करावी, अशी मागणी केली होती.
महापालिकेच्या बांधकाम विभागाने तत्परतेने या आंदोलनाची दखल घेतली व २४ तासांत कार्यवाही करून शुक्रवारी दुपारी तो खड्डा बुजविला.
पावसाळा असल्याने डांबरीकरण करता येत नसल्याने त्या ठिकाणी मुरूम टाकून खड्डा बुजविण्यात येऊन वाहतुकीसाठी रस्ता चांगला करण्यात आला. महापालिका निदान आंदोलनाची दखल घेऊन जनतेसाठी काम करीत असल्याचे समाधानही नागरिकांमध्ये व्यक्त होत आहे.












