भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पत्नी डॉ. सविता आंबेडकर ( शारदा कबीर ) यांचा जन्म २७ जानेवारी १९१२ ला झाला . त्यांचे वडील कृष्णराव कबीर हे सुरवाती पासूनच पुरोगामी विचारसरणीचे होते . त्यांचे कुटुंब सारस्वत ब्राह्मण होते मात्र जातीयता , अस्पृश्यता ते अजिबात मानत नव्हते . त्यांनी त्यांच्या सर्व मुला , मुलींचे लग्न अन्य जातीशी लावलेले होते .या सर्व कौटुंबिक वातावरणाचा परिणाम बालमनापासून सविता ऊर्फ शारदा कबीर यांच्यावर झालेला होता . या काळात मुलीने शिक्षण घेणे , नोकरी करणे , एखादा व्यवसाय करणे तसे फार धाडसाचे होते . असे असले तरी या कुटुंबातील सर्वच मुलं, मुली शिक्षण घेत होते . ते विविध हुद्द्यावर काम करीत होते. बाबासाहेबांचे घराणे हे कबीर पंथी होते, कृष्णराव कबीर यांचे घराणे सुद्धा कबीर पंथी होते . सविता ऊर्फ शारदा कबीर यांना तशी वाचनाची आवड असल्याने त्या क्रमिक अभ्यासाशिवाय अन्य पुस्तकांचे वाचन करीत असत . १९३७ ला त्यांनी एम.बी.बी.एस. चे शिक्षण पूर्ण केले व त्या डॉक्टर झाल्या. याच दरम्यान त्या आजारी पडल्या असता बौद्ध धर्मावरील काही पुस्तकं त्यांच्या वाचनात आली त्या पुस्तकांनी त्या एवढ्या प्रभावी झाल्या की त्यांनी अजून काही पुस्तकं मागवून घेतली व त्या एखाद्या अधाश्या प्रमाणे वाचू लागल्या . घरात त्या बुद्ध व त्यांच्या तत्वांविषयी बोलू लागल्या . बौद्ध धर्माचा अभ्यास करत करत त्यांनी एम. डी. ला प्रवेश घेतला.
आजारपणामुळे त्यांना एम. डी. होता आले नाही . आजारी असतानाच त्यांना मुख्य वैद्यकीय अधिकारी या मोठ्या हुद्याची नोकरी गुजरात येथे मिळाली . काही कारणांनी त्यांना ती नोकरी सोडावी लागली व त्या पुन्हा डॉ. माधवराव मालवणकर यांच्याकडं कनिष्ठ डॉक्टर म्हणून काम करू लागल्या. माईसाहेब यांचे वडील मैसूर चे होते विलेपार्ले येथे मैसूरचे डॉ. राव हे अर्थतज्ञ राहत होते , राव व कबीर हे जवळचे मित्र असल्याने हे दोघं कुटुंब अधून मधून एकत्र येत असत . डॉ. राव व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचीही चांगलीच मैत्री असल्याने बाबासाहेब राव यांचेकड अधून मधून येत असत. १९४७ च्या सुरवातीस बाबासाहेब डॉ. राव यांचेकडे आले असता त्याच दिवशी माईसाहेब सुद्धा तिथं आलेल्या होत्या . त्या भेटीत डॉ. राव यांनी माईंची ओळख बाबासाहेबांशी करून दिली . माईसाहेब यांना बाबासाहेबांबद्दल तशी बऱ्यापैकी माहिती होती पण , बाबासाहेबांना त्यांनी प्रथमच बघितले होते . बाबासाहेबांनी राव यांचे सोबत अर्थशास्त्र या बरोबरच बौद्ध धर्म या विषयावर सुद्धा चर्चा केली . ही चर्चा ऐकून त्या अतिशय प्रभावी झाल्या . बौद्ध धर्माविषयी बाबासाहेबांचा अभ्यास प्रचंड असल्याचे त्यांना कळून चुकले व त्या सुद्धा बाबासाहेबांशी चर्चा करू लागल्या . पुढं पुढं या भेटी वाढत गेल्या व त्यांना बाबासाहेबांचे एकूणच जीवन , कार्य , संघर्ष , आजारपण , भावी संकल्प कळत गेले.
बाबासाहेब हे डॉ. मालवणकर यांचेकडून नियमित आरोग्य तपासणी करीत असत तिथंच माईसाहेब नोकरीस होत्या त्यामुळे बाबासाहेबांना मधुमेह , रक्तदाब , सांधेदुखी , न्युरायटीस अश्या विविध आजारांनी घेरलेले असल्याने त्यांना नियमित औषधोपचार करणे व त्यांची सर्व काळजी घेणे आवश्यक आहे असे माईंना वाटले असता त्यांनी सदर औषधी विषयी , नियमित आहार विषयी , प्राणायाम विषयी बाबासाहेबांना सर्व समजून सांगितले व असेही सांगितलेकी , घरी तुमच्या पत्नीला हे सर्व समजून सांगा हवे तर मी त्यांना समजून सांगण्या करिता आपल्या घरी येईल . माईंच्या या वाक्याने तेथील वातावरण बदलून गेले . बाबासाहेबांच्या डोळ्यात पाणी आले. तेंव्हा त्यांनी एकूण परिस्थिती कथन केली तेंव्हा माईंना गहिवरून आले आणि त्यांनी साहेब मग तुमचे कसे होईल ? , तुमच्यावर विविध जबाबदाऱ्या आहेत , तुम्हाला खूप काही करायचे आहे ते कसे होईल ? असा प्रश्न केला . या प्रसंगातून ते दोघं एकमेकांचा विचार करू लागले , पुढं बाबासाहेबांनी माईंना सरळ लग्नाची मागणी घातली तेंव्हा माईंनी विचार करून सांगते असे सांगितले.
१९४७ ला माईंचे वय ३५ वर्षाचे तर बाबासाहेबांचे वय ५६ वर्षांचे होते . मधुमेहा मुळे बाबासाहेबांचे शरीर पोखरले गेले होते . १९२२ पासून त्यांना वेगवेगळे आजार जडत गेले होते . आजापणामुळे त्यांना बऱ्याचदा रात्र रात्र भर जागे राहावे लागत होते . १२वर्षांपासून ते एकाकी जीवन जगत होते . कामाचा प्रचंड ताण , विविध जबाबदाऱ्या , समाजाच्या उन्नातीचा ध्यास , त्यास होत असलेला प्रचंड विरोध या व अनेक बाबी लक्षात घेता बाबासाहेबांशी विवाह म्हणजे वैवाहिक जीवनाचे समर्पण होते . तेंव्हा बाबासाहेबांशी विवाह करण्यास माईंनी दिलेली संमती म्हणजे त्यांच्या त्यागाची परीसिमाच होती . बुद्ध यांनी सांगितलेल्या प्रेमाच्या , करुणेच्या , मैत्रीच्या तत्त्वांचा तो विजयच होता .
विवाहा नंतर माईंनी बाबासाहेबांच्या तब्येतीची पूर्ण काळजी तर घेतलीच त्याच बरोबर त्यांच्या सार्वजनिक कार्याला पूर्ण साथ दिली . बाबासाहेब १९०७ पासून तर माई साहेब १९३७ पासून बौद्ध विचारधारेशी जुळले होते व ते बौद्ध धर्माच्या अधिकाधिक जवळ येत गेले होते . आता दोघं विवाहबद्ध झाले असल्याने ते बौद्ध धर्म स्वीकारण्याच्या मानसिकतेचे झाले होते .बौद्ध धर्म स्वीकारायचा त्यांचा निश्चय १९५० मध्येच झाला होता . सिलोन मधील यंग मेन्स बुद्धीस्ट असोसिएशन , कोलंबो यांनी बाबासाहेबांना बौद्ध धर्म परिषदेस निमंत्रित केले . या परिषदेत माईसाहेब सुद्धा सहभागी झाल्या . दिल्ली मध्ये २ मे १९५१ रोजी आयोजित बुद्ध जयंती निमित्त बाबासाहेबांना निमंत्रित करण्यात आले असता या कार्यक्रमात माईसाहेब सुध्दा सहभागी झाल्या . घरात त्यांनी बुद्ध मूर्ती आणली , रोज त्रि सरण , पंचशील घेऊ लागले . प्रत्येक बौद्ध कार्यक्रमात त्या हिरीरीने भाग घेत गेल्या . बाबासाहेबांना संविधान लिहिण्याच्या कामात सुध्दा त्यांनी अहोरात्र सहकार्य केलेले होतेच . धर्मांतराचा सोहळा यशस्वी करण्यात त्यांनी खूप मेहनत घेतली . धर्मांतर सोहळ्या नंतर दीड महिन्याच्या अंतराने बाबासाहेबांचे महापरिनर्वाण झाले आणि त्यांचे आयुष्य उद्ध्वस्त झाले.
आंबेडकरी समूहातून त्यांच्यावर प्रचंड टीका सुरू झाल्या , जिवे ठार मारण्याचा प्रयत्न झाला , त्या पूर्णतः एकाकी पडल्या त्यामुळे त्या मानसिक व शारीरिकदृष्ट्या खचल्या . पुढं दलीत पँथर च्या नेत्यांना त्यांच्या विषयी कणव निर्माण झाली . त्यांनी माईंवर केलेगेलेले आरोप अभ्यासले व त्यात काहीही तथ्य नसल्याचे दिसून आल्याने त्यांनी माईंना सार्वजनिक जीवनात आणले . त्यांनी आंबेडकरी चळवळीत सक्रिय सहभाग घ्यायला सुरवात केली . नामांतराचा प्रश्न , रिडल्सचा प्रश्न , बौद्ध आरक्षणाचा प्रश्न वा इतर अनेक प्रश्न त्यांनी लाऊन धरले. अयोध्या येथील वादग्रस्त जागेचा प्रश्न सर्वोच्य न्यायालयात गेला असता सदर वादग्रस्त जागा ही बौद्ध वास्तू असल्या विषयीचा दावा त्यांनी सर्वोच्य न्यायालयात दाखल केला . अयोध्या व लगतच्या परिसरात भगवान गौतम बुद्ध यांचे १६ वर्षे वास्तव्य असल्याचे , हजारोच्या संख्येने बौद्ध भिक्खू या भागात बरीच वर्षे राहत असल्याचे दाखले तसेच पुरातत्व विभागास उत्खननात आढळून आलेल्या काही बाबी त्यांनी सादर केल्या . त्यांचा दावा सर्वोच्य न्यायालयाने दाखल करून घेतला .
डॉ. बाबासाहेब आंबेडकर , आंबेडकरी विचारधारा , आंबेडकरी चळवळ , बौद्ध धर्म या सर्वांविषयी अतिशय एकनिष्ठ राहिलेल्या व त्या करिता आपल्या सर्वस्वाचा त्याग करणाऱ्या माईसाहेबांना त्यांच्या जयंती निमित्त त्रिवार अभिवादन.











