जळगाव -: तालुक्यातील ममुराबाद येथे गावातील बारागाड्यांच्या यात्रेनिमित्त कुटुंबीय उत्सवात गेलेले असताना, येथील ५५ वर्षीय प्रौढाने राहत्या घरी गळफास घेऊन आपली जीवनयात्रा संपवली. भिकन किसन पाटील असे मृत व्यक्तीचे नाव असून, या हृदयद्रावक घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.
ममुराबाद येथे खंडोबाची यात्रा सुरू असल्याने रविवारी १ फेब्रुवारी रोजी भिकन पाटील यांचे कुटुंबीय यात्रेच्या सोहळ्यासाठी घराबाहेर गेले होते. यावेळी पाटील हे घरी एकटेच होते. याच संधीचा फायदा घेत त्यांनी घरात गळफास लावून घेतला. काही वेळाने जेव्हा पत्नी आणि मुले यात्रेतून घरी परतली, तेव्हा त्यांना भिकन पाटील हे गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळून आले. हा प्रकार पाहताच कुटुंबीयांनी एकच आक्रोश केला.
त्यांना तातडीने शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात हलवण्यात आले, मात्र तपासणीअंती डॉक्टरांनी त्यांना ‘मयत’ घोषित केले. या घटनेची माहिती मिळताच जळगाव तालुका पोलिसांनी रुग्णालयात धाव घेतली. याप्रकरणी तालुका पोलीस ठाण्यात सध्या अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. पाटील यांनी आत्महत्येसारखे टोकाचे पाऊल का उचलले, याचे कारण अद्याप समजू शकलेले नाही. पोलीस पुढील तपास करत आहेत.









