जिल्हा परिषद नांदेडसमोर रावसाहेब जाधव यांचे आमरण उपोषण सुरू!

0
4

प्रतिनिधी उध्दव मामडे 

नांदेड : जिल्हा परिषद कार्यालयासमोर रावसाहेब गोविंद जाधव यांनी विविध मागण्यांसाठी आमरण उपोषण सुरू केले आहे. मौजे शेलगाव (रेल्वे स्टेशन तांडा), ता. उमरी येथील गायरण गट क्रमांक 57 मधील प्लॉट व नमुना क्रमांक 08 संदर्भातील कथित गैरव्यवहाराची उच्चस्तरीय चौकशी करून दोषींवर कारवाई करण्याची त्यांनी मागणी केली आहे.

उपोषणकर्ते रावसाहेब जाधव यांच्या म्हणण्यानुसार, ग्रामपंचायत कार्यालयामार्फत देण्यात आलेल्या प्लॉटच्या नोंदीत फेरफार करण्यात आला असून, बनावट नमुना क्रमांक 08 तयार करून गैरव्यवहार झाल्याचा आरोप त्यांनी केला आहे. या प्रकरणात संबंधित ग्रामसेवकाची उच्चस्तरीय चौकशी करून फौजदारी गुन्हा दाखल करावा व निलंबित करावे, अशी त्यांची प्रमुख मागणी आहे.

तसेच प्लॉट क्रमांक 409A चे 409B मध्ये रूपांतर करून चुकीची चतुर्सीमा दाखवण्यात आल्याने शासनाची फसवणूक झाली असून, याची सखोल चौकशी करून संबंधितांवर गुन्हा दाखल करावा, अशी मागणीही त्यांनी केली आहे.

याशिवाय, चुकीच्या चतुर्सीमेच्या आधारे आपल्या कुटुंबावर उमरी पोलीस ठाण्यात दाखल झालेले खोटे गुन्हे मागे घेऊन न्याय द्यावा, तसेच गेल्या 20 वर्षांपासून आपल्या ताब्यात असलेल्या प्लॉटची अधिकृत नमुना क्रमांक 08 मध्ये नोंद करून संबंधित दस्तऐवज द्यावेत, अशीही त्यांनी प्रशासनाकडे मागणी केली आहे.

दरम्यान, प्रशासनाने या प्रकरणाची निष्पक्ष चौकशी करून न्याय द्यावा, अन्यथा उपोषण सुरूच ठेवण्याचा इशारा रावसाहेब जाधव यांनी दिला आहे.

Spread the love