शालार्थ आयडीच्या धर्तीवर धर्मादाय आयुक्त कार्यालयातील संस्थांचीही चौकशी करा! जळगाव संदेश विशेष – भाग – १

0
2

खोट्या कागदपत्रांवर संस्था बळकावल्याचा गंभीर आरोप; दोषी संस्थाचालकांवर फौजदारी गुन्हे दाखल करण्याची जितेंद्र काटे यांची मागणी

भुसावळ : शालेय शिक्षण विभागातील कथित शालार्थ आयडी घोटाळ्याने राज्यभर खळबळ उडवून दिल्यानंतर आता धर्मादाय आयुक्त कार्यालयातील शैक्षणिक संस्थांच्या नोंदींचीही सखोल चौकशी करण्याची मागणी पुढे आली आहे. ज्या पद्धतीने शालार्थ आयडीच्या माध्यमातून शासनाची कोट्यवधी रुपयांची फसवणूक झाल्याचे प्रकरण समोर आले, त्याच धर्तीवर खोट्या कागदपत्रांच्या आधारे धर्मादाय आयुक्त कार्यालयात संस्थांच्या नोंदी करण्यात आल्या आहेत का? याची आर्थिक गुन्हे शाखा व स्थानिक गुन्हे शाखेने चौकशी करावी, अशी जोरदार मागणी सामाजिक कार्यकर्ते जितेंद्र काटे यांनी केली आहे.

काटे यांनी प्रसिद्धीस दिलेल्या निवेदनात जळगाव जिल्ह्यातील अनेक शैक्षणिक संस्थांच्या कारभारावर गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. काही संस्थांमध्ये वर्षानुवर्षे निवडणुका होत नसल्याचा, संस्थांचे ऑडिट व्यवस्थित होत नसल्याचा तसेच संचालक मंडळातील व्यक्तींनाच आपल्या नावाचा संस्थेच्या नोंदीत समावेश असल्याची माहिती नसल्याचा दावा त्यांनी केला आहे.

संस्था की कौटुंबिक मालमत्ता?

काही शैक्षणिक संस्था या कुटुंबातील मोजक्या सदस्यांच्या ताब्यातच चालवल्या जात असल्याचा आरोप करण्यात आला आहे. संस्थेतील पदे व जबाबदाऱ्या लोकशाही पद्धतीने ठरविण्याऐवजी घरातील व्यक्तींमध्येच वाटून घेतल्या जात असल्याचे चित्र असल्याचा दावा काटे यांनी केला आहे.

विशेषतः भुसावळ तालुक्यात हा प्रकार सर्रास सुरू असल्याचा आरोप त्यांनी केला आहे. कुठे पती चेअरमन आणि पत्नी मुख्याध्यापक, तर कुठे पत्नी चेअरमन आणि पती मुख्याध्यापक, अशा पद्धतीने शैक्षणिक संस्थांचा कारभार सुरू असल्याचे त्यांनी निवेदनात म्हटले आहे.

धर्मादाय आयुक्त कार्यालयातील नोंदी संशयाच्या भोवऱ्यात?

सर्वात गंभीर आरोप म्हणजे काही संस्थाचालकांनी खोटे कागदपत्र तयार करून धर्मादाय आयुक्त कार्यालय, जळगाव येथे संस्थांच्या नोंदी केल्याचा दावा काटे यांनी केला आहे. या नोंदींची सत्यता तपासण्यासाठी संबंधित संस्थांच्या स्थापनेपासून आजपर्यंतच्या सर्व कागदपत्रांची छाननी करण्याची मागणी करण्यात आली आहे.

संस्थेच्या नोंदणीपासून कार्यकारिणीतील बदल, निवडणूक प्रक्रिया, सभांचे ठराव, सभासद नोंदवही, ऑडिट रिपोर्ट तसेच संस्थेच्या पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या यांची एकाच वेळी पडताळणी केल्यास अनेक धक्कादायक बाबी समोर येऊ शकतात, असा दावा काटे यांनी केला आहे.

शालार्थप्रमाणेच धर्मादाय संस्थांचाही ‘डेटा ऑडिट’ करा!

शिक्षण विभागातील कथित गैरप्रकारांची चौकशी करून काही प्रकरणांत कारवाई करण्यात आली आहे. त्याच धर्तीवर जळगाव जिल्ह्यातील शैक्षणिक संस्थांच्या धर्मादाय नोंदी आणि संबंधित शाळांच्या शालार्थ आयडीची परस्पर पडताळणी करण्यात यावी, अशी मागणी काटे यांनी केली आहे.

एका बाजूला शाळेच्या कागदपत्रांमध्ये एक संचालक मंडळ, तर दुसऱ्या बाजूला धर्मादाय कार्यालयाच्या नोंदीत वेगळेच संचालक मंडळ आहे का? संस्थेच्या नोंदीतील पदाधिकारी प्रत्यक्षात अस्तित्वात आहेत का? निवडणुका खरोखर झाल्या आहेत का? सभांचे ठराव खरे आहेत का? या सर्व बाबींची चौकशी होणे गरजेचे असल्याचे काटे यांनी म्हटले आहे.

‘राजकीय वरदहस्त’ असलेल्या संस्थाचालकांचीही चौकशी करा

कथित शालार्थ आयडी प्रकरणात प्रभावशाली व्यक्तींवर कारवाई झाली असल्याचे उदाहरण देत, धर्मादाय आयुक्त कार्यालयात खोट्या नोंदी करणाऱ्या संस्थाचालकांवरही कोणाचाही मुलाहिजा न ठेवता कारवाई करावी, अशी मागणी काटे यांनी केली आहे.

खोटे कागदपत्र तयार करून शासनाची किंवा संबंधित यंत्रणेची दिशाभूल केल्याचे तपासात निष्पन्न झाल्यास संबंधित संस्थाचालक व जबाबदार पदाधिकाऱ्यांवर फौजदारी गुन्हे दाखल करून कठोर कारवाई करावी, अशी मागणी त्यांनी केली आहे.

चौकशी झाली तर ‘संस्थांचे रहस्य’ उघड होणार?

जळगाव जिल्ह्यातील शैक्षणिक संस्थांच्या धर्मादाय नोंदींची स्वतंत्र तपासणी झाली, तर संस्थांच्या कारभारातील अनियमितता, बनावट कागदपत्रे, संशयास्पद कार्यकारिण्या आणि कथित कौटुंबिक वर्चस्वाचा पर्दाफाश होऊ शकतो, असा दावा जितेंद्र काटे यांनी केला आहे.

त्यामुळे आता प्रशासन आणि पोलिस यंत्रणा या आरोपांची दखल घेणार का? धर्मादाय आयुक्त कार्यालयातील नोंदींचे ‘ऑडिट’ होणार का? शालार्थ आयडी आणि संस्थांच्या नोंदींची क्रॉस-चेकिंग होणार का? आणि दोषी आढळणाऱ्यांवर फौजदारी कारवाई होणार का? याकडे जळगाव जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.

Spread the love