माध्यमिकला बायफोकल पद्धतीने तर प्राथमिकला केंद्र स्तरावर भरतीसाठी विशेष परवानगीची शा. शि. व क्रीडा शिक्षक महासंघाची मागणी.
प्रतिनिधी – जितेंद्र काटे
भुसावळ – पवित्र पोर्टलद्वारे चालू असलेल्या शिक्षक भरतीत काही तांत्रिक बाबींमुळे शारीरिक शिक्षकांच्या अतिशय कमी जागा आल्याने तांत्रिक बाबींची त्रुटी दूर करून विशेष भरतीसाठी परवानगी द्यावी अशी मागणी महाराष्ट्र शारीरिक शिक्षण व क्रीडा शिक्षक महासंघाचे अध्यक्ष राजेंद्र कोतकर, कार्याध्यक्ष राजेश जाधव सचिव प्रा. विश्वनाथ पाटोळे यांनी केली आहे.
१५ मार्च २०२४ च्या संचमान्यतेच्या शासन निर्णयाने संचमान्यतेत आलेली शारीरिक शिक्षण पदे भरताना बायफोकल पदधतीने भरती होणे आवश्यक होते. मात्र पवित्र पोर्टलच्या नोटीफिकेशन मध्ये शारीरिक शिक्षण व विषय गट न दिल्याने, पूर्ण कार्यभार बसेल अशाच पदांची मागणी संस्थाचालकांनी केल्याने मोजक्याच जागा पोर्टलवर अपलोड झाल्या आहेत. पदभरतीत सात ते आठ हजार जागा अपेक्षित असताना त्या शेकड्यात आल्याने पदवीधारकांची घोर निराशा झाली आहे.
२ जानेवारीच्या शासन निर्णयाने प्राथमिकसाठी ४८६० पदे निर्माण झाली. पदभरतीसाठी सेवाशर्ती नियमावली तयार होऊन त्या बाबत शासनांकडून मंजुरी न मिळाल्याने पोर्टलवर त्या जागा दाखवल्या गेल्याच नाही. तसेच संचमान्यतेत ज्युनिअर कॉलेजच्या तासिकांचा कालावधी कमी केल्याने शारिरिक शिक्षण तासिकांवर गंडांतर आले. तसेच आहे तीच पदे कमी झाल्याने व कार्यभार इतर विषयाला दाखविल्याने हजारो जागा पोर्टलवर अपलोड झाल्याच नाही.
पदभरती संदर्भात संघटनेचे सचिव विश्वनाथ पाटोळे यांनी बायफोकल पद्धतीने भरती व पवित्र पोर्टलवरील नोटीफिकेशन संदर्भातील तांत्रिक त्रुटीं संदर्भात वेळोवेळी पाठपुरावा केला . हजारो शारीरिक शिक्षण पदवीधारक अभियोग्यता धारक असूनही पदभरतीतील तांत्रिक त्रुटीमुळे, सेवाशर्ती नियमावली न आल्याने व वयाच्या अटीमुळे व्यवस्थेतून कायमचे बाहेर पडणार असल्याने या भरती प्रक्रियेत विषयाच्या भरतीसाठी विशेष परवानगी देऊन न्याय द्यावा अशी मागणी शारीरिक शिक्षण व क्रीडा शिक्षक महासंघाचे वतीने निवेदना द्वारे करण्यात आल्याची माहिती जळगाव जिल्हा शारीरिक शिक्षण व क्रीडा शिक्षक महासंघाचे कार्याध्यक्ष प्रशांत कोल्हे,सचिव राजेश जाधव, जिल्हा युवा क्रीडा शिक्षक महासंघांचे अध्यक्ष डॉ. रणजित पाटील सचिव प्रा. हरीश शेळके, जिल्हा महिला क्रीडा शिक्षक महासंघाच्या अध्यक्षा कांचन नारखेडे सचिव डॉ. कांचन विसपुते यांनी दिली.
राजेश जाधव : सचिव : जळगाव जिल्हा शारीरिक शिक्षण व क्रीडा शिक्षक महासंघ.












