सुनसगावात नवरात्रोत्सवानिमित्त दुर्गा दौड उत्साहात संपन्न!

0
3

तरुण-तरुणींचा उत्स्फूर्त सहभाग; ठिकठिकाणी औक्षण करून दौडमधील कार्यकर्त्यांचे स्वागत

प्रतिनिधी जितेंद्र काटे | भुसावळ

भुसावळ तालुक्यातील सुनसगाव येथे नवरात्रोत्सवानिमित्त दुर्गा दौडीचे उत्साहपूर्ण आयोजन करण्यात आले. या उपक्रमात गावातील तरुण-तरुणींनी मोठ्या उत्साहाने सहभाग नोंदवत धार्मिक आणि सांस्कृतिक परंपरेचे दर्शन घडविले.

नवरात्रोत्सवाच्या प्रत्येक दिवशी सकाळी गावातील तरुण-तरुणी हातात लाठी-काठी घेऊन दुर्गा दौडमध्ये सहभागी होत होते. गावातील विविध भागांतून ही दौड काढण्यात येत होती. यावेळी गावातील प्रत्येक दुर्गा मंडळाला भेट देत देवीचे दर्शन घेण्यात येत होते. लाठी-काठीसह शिस्तबद्ध पद्धतीने काढण्यात येणाऱ्या या दौडीमुळे गावात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले होते.

दुर्गा दौडमध्ये सहभागी झालेल्या कार्यकर्त्यांचे गावातील विविध ठिकाणी नागरिकांकडून औक्षण करून स्वागत करण्यात आले. या स्वागतामुळे सहभागी तरुण-तरुणींचा उत्साह अधिक वाढला. नवरात्रोत्सवाच्या निमित्ताने गावात भक्तिमय वातावरण निर्माण झाले होते.

दुर्गा दौडीच्या माध्यमातून तरुण पिढीमध्ये धार्मिक परंपरांविषयी जागरूकता निर्माण होण्यासोबतच शिस्त, एकजूट आणि सामाजिक बांधिलकीची भावना दृढ होण्यास मदत होत आहे. सुनसगावातील या उपक्रमामुळे नवरात्रोत्सवाला विशेष उत्साह प्राप्त झाला.

Spread the love