वराडसीम ग्रामपंचायत कार्यालया समोर विविध मागण्यांसाठी उपोषणाला सुरुवात !

0
2

प्रतिनिधी – जितेंद्र काटे 

भुसावळ – तालुक्यातील वराडसीम ग्रुप ग्रामपंचायत अंतर्गत गावातील शिक्षण, स्वच्छता, सार्वजनिक आरोग्य व नागरिकांच्या सुरक्षिततेशी संबंधित अत्यंत महत्त्वाच्या विकास कामांकडे दुर्लक्ष होत असल्याने गावातील तरुणांनी दि.१९ ऑक्टोबर २०२६ रोजी सकाळी ९ वाजेपासून बेमुदत उपोषणाला सुरुवात केली आहे.

गावातील विद्यार्थी, युवक, महिला व सर्वसामान्य नागरिकांच्या हितासाठी आवश्यक असलेली विकासकामे प्रलंबित राहणे ही गंभीर बाब आहे. संबंधित प्रशासनाने या समस्यांची दखल घेऊन तातडीने कार्यवाही करणे आवश्यक आहे.उपोषण कर्त्यांच्या प्रमुख मागण्या पुढील प्रमाणे आहेत

१) स्पर्धा परीक्षा अभ्यासिका सुरू करणे : गावातील ग्रामीण व आर्थिकदृष्ट्या दुर्बल विद्यार्थ्यांना MPSC, UPSC, रेल्वे, पोलीस भरती व इतर स्पर्धा परीक्षांच्या तयारीसाठी स्वतंत्र, सुसज्ज व मोफत सार्वजनिक अभ्यासिका उपलब्ध करून देण्यात यावी. त्यामध्ये पुस्तके, वाचनालय, वीज, पिण्याचे पाणी व आवश्यक शैक्षणिक सुविधा उपलब्ध कराव्यात.

२)जिल्हा परिषद शाळांची तातडीने दुरुस्ती : गावातील जिल्हा परिषद मुलांची शाळा, मुलींची शाळा व उर्दू शाळेच्या इमारतींची आवश्यक दुरुस्ती करून स्वच्छतागृहे, शुद्ध पिण्याचे पाणी, सुरक्षित वर्गखोल्या व इतर मूलभूत सुविधा उपलब्ध करून देण्यात याव्यात.

३)गटारी व नाल्यांची नियमित सफाई : गावातील सर्व गटारी व नाल्यांची तातडीने स्वच्छता करून साचलेले सांडपाणी, दुर्गंधी व डासांचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी कायमस्वरूपी स्वच्छता नियोजन करण्यात यावे. नियमित सफाईचे वेळापत्रक जाहीर करावे.

४) सार्वजनिक ठिकाणी CCTV कॅमेरे बसविणे : गावातील बसस्थानक, मुख्य चौक, बाजार परिसर, शाळा परिसर व इतर संवेदनशील सार्वजनिक ठिकाणी आवश्यकतेनुसार CCTV कॅमेरे बसविण्यात यावेत. बसविलेल्या कॅमेऱ्यांची देखभाल स्थिती व रेकॉर्डिंगची सुरक्षित व्यवस्था करण्यात यावी.

वरील चारही मागण्या गावातील शिक्षण, आरोग्य, स्वच्छता व सार्वजनिक सुरक्षिततेशी थेट संबंधित आहेत. त्यामुळे अक्षय संतोष सपकाळे ,इस्माईल पिंजारी , शोएब पिंजारी ,वासिम मनियार ,सागर कोळी ,अल्ताफ मनियार ,फिरोज पिंजारी ,दुर्गेश भारंबे,अल्ताफ पिंजारी ,किरण इंगळे ,सचिन सपकाळे ,भूषण पारधी ,हाफिज पिंजारी यांनी उपोषणाला सुरुवात केली असून उपोषण स्थळी सरपंच पती उमेश पाचपांडे यांनी भेट देऊन सुचवलेल्या कामांसाठी वेळ द्यावा अशी विनंती केली आहे मात्र बऱ्याच वेळा सांगूनही कामे होत नसल्याने उपोषणाला बसल्याचे अक्षय संतोष सपकाळे यांनी सांगितले आहे.

Spread the love