शासन निर्णयातील उल्लाघन अटी, खरेदीची मंजुरी आणि वीजबिलाच्या खर्चाची तपासणी करण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार
नशिराबाद, प्रतिनिधी :
नशिराबाद नगरपरिषदेचे मुख्याधिकारी रविंद्र रघुनाथ सोनवणे यांच्या दालनात वातानुकूलित यंत्र (AC) बसविण्यात आल्याच्या प्रकरणाची सखोल चौकशी करावी, अशी मागणी जळगाव जिल्हा जनरल कामगार सेनेचे अध्यक्ष प्रदीप अनिल साळी यांनी जिल्हाधिकारी, जळगाव तसेच विभागीय आयुक्त, नाशिक यांच्याकडे तक्रार अर्जाद्वारे केली आहे. या प्रकरणात शासन निर्णयातील तरतुदींचे पालन झाले नाही, तसेच सार्वजनिक निधीतून करण्यात आलेल्या खर्चाला आवश्यक प्रशासकीय व आर्थिक मंजुरी होती का, याची तपासणी करण्याची मागणी करण्यात आली आहे.
तक्रार अर्जानुसार, मुख्याधिकारी यांच्या दालनात २२ मार्च २०२२ पासून वातानुकूलित यंत्र बसविण्यात आल्याचा मुद्दा उपस्थित करण्यात आला आहे. महाराष्ट्र शासनाच्या सामान्य प्रशासन विभागाच्या २५ मे २०२२ च्या शासन निर्णयाचा संदर्भ देत, संबंधित पदाची वेतनश्रेणी आणि AC सुविधेसाठी लागू असलेल्या पात्रतेची पडताळणी करावी, अशी मागणी तक्रारदाराने केली आहे.
AC खरेदी आणि खर्चाची चौकशी करण्याची मागणी
AC खरेदीसाठी काढण्यात आलेले बिल, खरेदी आदेश, प्रशासकीय मंजुरी, निविदा किंवा कोटेशन प्रक्रिया, अर्थसंकल्पातील तरतूद आणि संबंधित लेखा नोंदी तपासण्यात याव्यात, अशी मागणी तक्रारीत करण्यात आली आहे. तसेच AC बसविल्यानंतर झालेल्या वीजखर्चाची तपासणी करून सार्वजनिक निधीचा वापर नियमानुसार झाला आहे का, हे स्पष्ट करण्याची मागणी करण्यात आली आहे.
दोष आढळल्यास जबाबदारी निश्चित करून शिस्तभंगा ची कारवाई करण्याची मागणी
या प्रकरणात अनियमितता आढळल्यास संबंधित अधिकारी व कर्मचाऱ्यांची जबाबदारी निश्चित करून नियमानुसार प्रशासकीय कारवाई करावी. आवश्यक असल्यास खर्चाच्या वसुलीबाबतही नियमानुसार निर्णय घ्यावा, अशी मागणी तक्रारदाराने केली आहे. तक्रार अर्जात स्वतंत्र व निष्पक्ष चौकशी समिती स्थापन करण्याची तसेच चौकशीचा अहवाल आणि अंतिम निर्णय तक्रारदाराला कळविण्याची मागणीही करण्यात आली आहे.
या तक्रारीतील आरोप अद्याप चौकशीत सिद्ध झालेले नाहीत. संबंधित नगरपरिषद प्रशासनाची बाजू आणि अधिकृत चौकशीचा निष्कर्ष समोर आल्यानंतरच या प्रकरणातील वस्तुस्थिती स्पष्ट होणार आहे. त्यामुळे संबंधित वरिष्ठ अधिकारी या तक्रारीची दखल घेऊन कोणती कार्यवाही करतात, याकडे लक्ष लागले आहे.









