जळगाव जिल्हा जनरल कामगार सेनेची मुख्याधिकाऱ्यांकडे मागणी
नशिराबाद, प्रतिनिधी : नशिराबाद नगरपरिषदेमार्फत सुरू असलेल्या विविध विकासकामांमध्ये तसेच घनकचरा व्यवस्थापन व इतर कंत्राटी कामांमध्ये कार्यरत असलेल्या पात्र कंत्राटी कामगारांना बोनस प्रदान अधिनियम, १९६५ व लागू नियमांनुसार वार्षिक बोनस मिळावा, अशी मागणी जळगाव जिल्हा जनरल कामगार सेनेचे अध्यक्ष प्रदीप अनिल साळी यांनी नगरपरिषदेच्या मुख्याधिकाऱ्यांकडे लेखी निवेदनाद्वारे केली आहे.
नशिराबाद नगरपरिषदेच्या विविध विकासकामांमध्ये अनेक कंत्राटी कामगार काम करीत असून, शहराच्या विकासात आणि स्वच्छता व्यवस्थेत त्यांचे महत्त्वपूर्ण योगदान आहे. मात्र, संबंधित पात्र कामगारांना कायद्यानुसार देय असलेला वार्षिक बोनस मिळतो , याची प्रशासनाने तपासणी करून आवश्यक कार्यवाही करावी, अशी मागणी संघटनेने केली आहे.
निवेदनात पात्र कंत्राटी कामगारांची माहिती संकलित करून त्यांना नियमानुसार बोनस मिळत असल्याची खात्री करावी, संबंधित कंत्राटदारांना देय बोनस अदा करण्याबाबत आवश्यक निर्देश द्यावेत, तसेच बोनस वितरणाच्या नोंदी व पुरावे तपासावेत, असे नमूद करण्यात आले आहे.
तसेच, पात्र कामगारांना बोनस देण्यास टाळाटाळ होत असल्याचे आढळल्यास संबंधित कंत्राटदारांची कायद्यानुसार चौकशी करून आवश्यक ती कारवाई करावी. नगरपरिषदेच्या विविध कंत्राटी कामांमध्ये कार्यरत असलेल्या पात्र कामगारांना त्यांच्या कायदेशीर हक्कांपासून वंचित ठेवले जाऊ नये, अशी भूमिका संघटनेने मांडली आहे.
कामगारांच्या हक्कांसाठी संघटना आक्रमक
कंत्राटी कामगार शहराच्या विकासासाठी प्रत्यक्ष मेहनत घेत असतात. त्यामुळे त्यांच्या श्रमाचा योग्य मोबदला आणि कायद्यानुसार मिळणारे आर्थिक लाभ वेळेत मिळणे आवश्यक आहे. पात्र कामगारांना दिवाळीच्या च्या आत वार्षिक बोनस मिळवून देण्यासाठी प्रशासनाने तातडीने दखल घ्यावी, अशी मागणी अध्यक्ष प्रदीप साळी यांनी केली आहे.
सदर निवेदनावर नगरपरिषद प्रशासनाकडून कोणती कार्यवाही केली जाते, याकडे संबंधित कंत्राटी कामगारांचे लक्ष लागले आहे.










