प्रतिनिधी -जितेंद्र काटे
भुसावळ – गावाच्या विकासासाठी केवळ भाषणे करून चालत नाही, तर प्रत्यक्ष कृतीतून सामाजिक बांधिलकी जपावी लागते. याच विचाराला कृतीची जोड देत कुऱ्हा (पानाचे) येथील तरुण आणि ग्रामस्थांनी वैकुंठधाम अर्थात स्मशानभूमीच्या स्वच्छता मोहिमेत श्रमदान केले. या मोहिमेमुळे वैकुंठधामचा परिसर चकाचक झाला असून, स्वच्छ आणि प्रसन्न वातावरण निर्माण झाल्याने सहभागींच्या मनाला समाधान लाभले. स्मशानभूमी म्हटले की डोळ्यांसमोर येते ते दुःख, विरह आणि जीवनाचा अंतिम प्रवास; मात्र याच ठिकाणी स्वच्छता राखणे हीदेखील समाजाची महत्त्वाची जबाबदारी आहे. या भावनेतून पुढाकार घेत काही मोजक्या शिलेदारांनी प्रत्यक्ष श्रमदान करत वैकुंठधामचा परिसर स्वच्छ केला.
या स्वच्छता मोहिमेत श्रीकांत बरकले, मनोज पाटील, तुळशीराम बरकले, राजू पाटील, माजी सैनिक राजू पाटील, प्रवीण धनगर, माऊली, अरविंद बावस्कर, किशोर रोनखेडे , गणेश रोनखेडे , सुनील जैन, संतोष सपकाळे, किरण रंजाळे, पियुष पाटील, राहुल चौधरी ग्रामविकास अधिकारी अनिल कोळी, मधुकर पाटील योगेश पाटील , पप्पू कोळी , महेंद्र कोळी , अजय कोळी, किरण कोळी, चेतन कोळी, बाळू कोळी,निलेश डांबरे, विकास धांडे, अजय नाथ आणि बंडू वारी यांनी सहभाग नोंदवला.
गावाच्या स्वच्छतेचा विषय निघाला की अनेक जण चर्चा करतात; मात्र प्रत्यक्ष कामासाठी पुढे येणाऱ्यांची संख्या मोजकीच असते. वैकुंठधामच्या स्वच्छता मोहिमेतून हीच वस्तुस्थिती पुन्हा अधोरेखित झाली. उपस्थित शिलेदारांनी आपल्या कृतीतून गावाप्रती असलेली जबाबदारी सिद्ध केली.
स्वच्छता ही केवळ एका दिवसाची मोहीम नसून, ती प्रत्येक नागरिकाच्या जीवनशैलीचा भाग बनली पाहिजे. गावातील सार्वजनिक ठिकाणे, रस्ते, शाळा आणि स्मशानभूमी स्वच्छ ठेवण्यासाठी प्रत्येकाने पुढाकार घेणे आवश्यक आहे.
वैकुंठधाम चकाचक झाले, परिसर प्रसन्न झाला; पण या मोहिमेचा खरा विजय म्हणजे सामाजिक जबाबदारीची जाणीव जागृत होणे!
गावाच्या परिवर्तनासाठी मोठ्या घोषणांपेक्षा प्रत्यक्ष काम करणाऱ्या हातांची गरज असते. आज या शिलेदारांनी श्रमदानातून हाच संदेश दिला आहे.









