वाळकी शेंदणी सरपंच प्रकरणात अपर विभागीय आयुक्तांचा मोठा निर्णय!

0
2

अपर जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाला अंतरिम स्थगिती; रुख्माबाई साळुंके यांना दिलासा

चोपडा : प्रतिनिधी वाळकी शेंदणी (ता. चोपडा, जि. जळगाव) ग्रामपंचायतीच्या लोकनियुक्त सरपंच पदासंदर्भातील वादात अपर विभागीय आयुक्त, नाशिक विभाग यांनी महत्त्वपूर्ण अंतरिम आदेश दिला आहे. अपर जिल्हाधिकारी, जळगाव यांनी 18 नोव्हेंबर 2026 रोजी पारित केलेल्या आदेशाला स्थगिती देण्यात आल्याने सरपंच पदाच्या वादाला नवे वळण मिळाले आहे.

वाळकी शेंदणी येथील तक्रारदार दिपाली दिपक पाटील यांच्या तक्रारीवरून महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियमांतर्गत दाखल ग्रामपंचायत विवाद अर्जात अपर जिल्हाधिकारी, जळगाव यांनी 18 नोव्हेंबर 2026 रोजी अपात्रतेसंदर्भात आदेश पारित केला होता. या आदेशाविरुद्ध अपीलार्थी रुख्माबाई शामराव साळुंके (रुख्माबाई वसंत कोळी) यांनी अपर विभागीय आयुक्त, नाशिक विभाग यांच्याकडे अपील दाखल केले. तसेच सदर आदेशाला स्थगिती मिळावी, यासाठी स्वतंत्र अर्जही सादर करण्यात आला होता.

अपीलार्थींच्या वतीने सादर करण्यात आलेले कायदेशीर मुद्दे, अभिलेख व प्रकरणातील परिस्थिती विचारात घेत अपर विभागीय आयुक्तांनी अपर जिल्हाधिकारी, जळगाव यांच्या आदेशाला अंतरिम स्थगिती दिली आहे. मुदतीत जात वैधता प्रमाणपत्र सादर करण्याच्या मुद्द्यावर अपील प्रथमदर्शनी ग्राह्य धरून हा अंतरिम आदेश पारित करण्यात आल्याचे समजते.

अपीलार्थींच्या वतीने अॅड. वसंत भोलाणकर यांनी प्रभावी कायदेशीर बाजू मांडली. अपर विभागीय आयुक्तांच्या आदेशामुळे रुख्माबाई साळुंके यांना अंतरिम न्यायालयीन दिलासा मिळाला असून, सरपंच पदासंदर्भातील पुढील न्यायालयीन प्रक्रियेकडे ग्रामस्थांचे लक्ष लागले आहे.

अपर जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाला स्थगिती मिळाल्यानंतर या प्रकरणातील अंतिम निर्णय काय लागतो, याबाबत वाळकी शेंदणी परिसरात उत्सुकता निर्माण झाली आहे.

Spread the love