अज्ञात वाहनाच्या कटमुळे दुचाकीस्वार खाली पडला; मागून आलेल्या ट्रकखाली आल्याने दुर्दैवी अंत
प्रतिनिधी जितेंद्र काटे – जळगाव : सिल्लोड येथे साखरपुड्याचा कार्यक्रम आटोपून दुचाकीने आपल्या गावाकडे परतणाऱ्या मामा-भाच्याच्या दुचाकीला अज्ञात वाहनाने कट मारल्याने भीषण अपघात झाला. या अपघातात मामाचा दुर्दैवी मृत्यू झाला, तर भाचा जखमी झाला. ही घटना रविवारी (दि. १५ नोव्हेंबर) जळगाव तालुक्यातील विटनेर गावाजवळ घडली.
अनिल नागो सपकाळे (वय ४३, रा. दापोरा) असे मृत व्यक्तीचे नाव आहे. ते आपल्या भाच्यासह सिल्लोड येथील साखरपुड्याचा कार्यक्रम आटोपून दुचाकीने दापोरा येथे परतत होते. दरम्यान, विटनेर गावाजवळ त्यांच्या दुचाकीला अज्ञात वाहनाने कट मारला. त्यामुळे दुचाकीवरील दोघेही खाली पडले. याचवेळी मागून येणाऱ्या ट्रकचे चाक अनिल सपकाळे यांच्या पायावरून गेल्याने ते गंभीर जखमी झाले.
अपघातानंतर त्यांना तातडीने उपचारासाठी जळगाव येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात (जीएमसी) दाखल करण्यात आले. मात्र, वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासणीअंती त्यांना मृत घोषित केले. या अपघातात त्यांचा भाचा जानकीराम किसन सोनवणे हा किरकोळ जखमी झाला आहे.
या घटनेमुळे दापोरा परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. याप्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून, सहायक पोलीस निरीक्षक प्रमोद वाघ यांच्या मार्गदर्शनाखाली तपास अंमलदार पोलीस नाईक पंकज पाटील पुढील तपास करीत आहेत.







