माजी आमदार रमेशदादा पाटील आणि युवा प्रदेशाध्यक्ष ॲड. चेतनदादा पाटील यांच्या हस्ते नियुक्तीपत्र प्रदान; जळगाव जिल्ह्यातील पदाधिकाऱ्यांच्याही नियुक्त्या
जळगाव : आदिवासी कोळी समाजाच्या न्याय्य हक्कांसाठी सातत्याने लढा देणारे सामाजिक कार्यकर्ते प्रल्हाद सोनवणे यांची कोळी महासंघाच्या खान्देश संपर्कप्रमुखपदी नियुक्ती करण्यात आली आहे. कोळी समाजाच्या संघटनात्मक बांधणीसाठी आणि समाजाच्या विविध प्रलंबित प्रश्नांना न्याय मिळवून देण्यासाठी त्यांनी केलेल्या कार्याची दखल घेत महासंघाने त्यांच्यावर ही महत्त्वपूर्ण जबाबदारी सोपवली आहे.
दि. १५ नोव्हेंबर रोजी भगवान बिरसा मुंडा जयंतीनिमित्त लोणावळा येथे कोळी महासंघाच्या वतीने आयोजित राज्यस्तरीय विशेष विचारविनिमय बैठकीत माजी आमदार तथा कोळी महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष रमेशदादा पाटील आणि युवा प्रदेशाध्यक्ष ॲड. चेतनदादा पाटील यांच्या हस्ते प्रल्हाद सोनवणे यांना नियुक्तीपत्र प्रदान करण्यात आले.
प्रल्हाद सोनवणे यांनी आदिवासी कोळी समाजातील नागरिकांना जात प्रमाणपत्र व जात वैधता प्रमाणपत्र मिळविताना येणाऱ्या अडचणी दूर करण्यासाठी सातत्याने प्रयत्न केले आहेत. तसेच समाजातील राजकीय पदाधिकारी, महिला, विद्यार्थी आणि युवकांच्या विविध प्रश्नांसाठी सामाजिक अधिवेशने, मेळावे, आंदोलने, उपोषणे व मोर्चांमध्ये सक्रिय सहभाग घेत समाजाचे प्रश्न शासन आणि प्रशासनापर्यंत पोहोचविण्याचे काम केले आहे.
समाजाचा सर्वांगीण विकास व्हावा, समाजबांधवांना शासनाच्या विविध योजनांचा लाभ मिळावा आणि सामाजिक हक्कांसाठी समाजाची एकजूट निर्माण व्हावी, या उद्देशाने ते सातत्याने कार्यरत आहेत. भाजपा अनुसूचित जमाती मोर्चाच्या माध्यमातूनही त्यांनी सामाजिक प्रश्नांवर काम केले आहे. यासोबतच रिक्षाचालकांच्या संघटनेचे अध्यक्ष म्हणूनही ते कार्यरत आहेत.
या बैठकीत जळगाव पूर्व जिल्हाध्यक्षपदी हरिलाल कोळी, जळगाव पश्चिम जिल्हाध्यक्षपदी संदीप कोळी, तर जळगाव महानगर अध्यक्षपदी भगवान सोनवणे यांचीही नियुक्ती करण्यात आली.
यावेळी कोळी महासंघाचे कार्याध्यक्ष प्रकाश बोबडी, सरचिटणीस राजहंस टपके, प्रदेश नेते सतीश धडे, देवानंद भोईर, उपाध्यक्ष प्रा. सुरेश पाटकर, जळगाव जिल्हा प्रभारी जितेंद्र सपकाळे, सिद्धेश्वर कोळी, शानाभाऊ सोनवणे, डी. एम. कोळी, युवराज सैंदाणे, सुभाष सोनवणे, नितीन कांडेलकर, देविदास कोळी, बबलू कोळी यांच्यासह राज्यातील प्रमुख नेते, विविध संघटनांचे अध्यक्ष, पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
प्रल्हाद सोनवणे यांच्या या नियुक्तीमुळे जळगाव, धुळे, नंदुरबार, नाशिक, मालेगाव, भुसावळ आणि अहिल्यानगर परिसरातील कोळी समाजात आनंदाचे वातावरण निर्माण झाले असून, विविध स्तरांतून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.
खान्देश विभागात कोळी महासंघाची संघटनात्मक बांधणी अधिक मजबूत करणे, समाजातील बंधू-भगिनी व युवकांना संघटित करणे आणि समाजाचे प्रलंबित प्रश्न मार्गी लावण्यासाठी महासंघाच्या माध्यमातून नव्या जोमाने कार्य करणार असल्याचा विश्वास नवनियुक्त खान्देश संपर्कप्रमुख प्रल्हाद सोनवणे यांनी व्यक्त केला.






