कार्यालय बंद, जबाबदार अधिकारी कोण हेही स्पष्ट नाही; पंचायत समितीच्या कारभारावरही उपस्थित झाले प्रश्नचिन्ह
सुनसगाव (ता. भुसावळ) : ग्रामपंचायत ही गावाच्या विकासाचा आणि नागरिकांच्या दैनंदिन कामकाजाचा महत्त्वाचा केंद्रबिंदू असताना सुनसगाव ग्रामपंचायतीचा कारभार मात्र सध्या रामभरोसे सुरू असल्याचे चित्र समोर आले आहे. दिवाळीची सुट्टी संपूनही ग्रामपंचायत कार्यालय बंद असल्याने ग्रामस्थांना विविध कामांसाठी हेलपाटे मारावे लागत आहेत. विशेष म्हणजे ग्रामपंचायत अधिकारी रजेवर असल्याचे सांगण्यात येत असले, तरी त्यांच्या अनुपस्थितीत कार्यालयाचा कार्यभार नेमका कोणाकडे सोपविण्यात आला आहे, याची माहितीही ग्रामस्थांना मिळू शकलेली नाही.
ग्रामपंचायत कार्यालय बंद असल्यामुळे जन्म-मृत्यू दाखले, विविध शासकीय कागदपत्रे, ग्रामपंचायतीशी संबंधित कामे तसेच इतर प्रशासकीय कामांसाठी येणाऱ्या नागरिकांची मोठी गैरसोय होत आहे. गावातील नागरिकांनी आपल्या समस्या मांडायच्या तरी कोणाकडे, असा प्रश्न निर्माण झाला आहे.
एकीकडे शासन ग्रामविकास आणि लोकाभिमुख प्रशासनाच्या गप्पा मारत असताना दुसरीकडे गावातील ग्रामपंचायत कार्यालयच बंद राहत असेल, तर सामान्य नागरिकांनी न्याय मागायचा कोणाकडे? अधिकाऱ्यांच्या अनुपस्थितीत पर्यायी व्यवस्था करणे ही प्रशासनाची जबाबदारी नाही का? असा सवाल ग्रामस्थांकडून उपस्थित केला जात आहे.
विशेष म्हणजे या संपूर्ण प्रकाराकडे पंचायत समिती प्रशासनाचे लक्ष आहे की नाही, असा प्रश्नही आता उपस्थित होत आहे. संबंधित वरिष्ठ अधिकाऱ्यांनी केवळ कागदोपत्री खुलासा मागवून न थांबता प्रत्यक्ष परिस्थितीची पाहणी करावी आणि जबाबदार अधिकाऱ्यांवर योग्य ती कारवाई करावी, अशी जोरदार मागणी ग्रामस्थांकडून होत आहे.
ग्रामपंचायत कार्यालय नागरिकांच्या सेवेसाठी आहे की अधिकाऱ्यांच्या सोयीनुसार बंद ठेवण्यासाठी? असा संतप्त सवाल उपस्थित करत सुनसगाव ग्रामपंचायतीचा कारभार तातडीने सुरळीत करण्याची मागणी ग्रामस्थांनी केली आहे.







