राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या कर्तुत्त्वाचा डंका देशभर वाजत असून त्यावर पुन्हा एकदा शिक्कामोर्तब झाले आहे. इंग्रजी वृत्तपत्र इंडियन एक्सप्रेसकडून जाहीर करण्यात आलेल्या 2022 मधल्या 100 शक्तीशाली हिंदुस्थानींच्या यादीमध्ये राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे नाव झळकले आहे. त्यामुळे उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्त्वावर पुन्हा एकदा शिक्कामोर्तब झाले आहे. या यादीमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी हे पहिल्या क्रमांकावर आपले स्थान टिकवून आहेत तर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष खासदार शरद पवार यांनाही स्थान मिळाले आहे. उद्धव ठाकरे यादीत 16 व्या स्थानावर आहेत तर शरद पवार यांचा 17 वा क्रमांक आहे.
प्रशासनाचा थेट अनुभव नसताना उद्धव ठाकरे यांनी विषम परिस्थितीत तीन पक्षाचे मिळून सरकार स्थापन केले, कोरोना काळातही उत्तम काम केलं, मुंबई आणि विशेषत: धारावी सारख्या अत्यंत दाटवस्तीच्या ठिकाणाला कोरोनाच्या संकटातून बाहेर काढण्याच्या प्रयत्नाचं कोर्टानं आणि विविध संस्थांनी कौतुक केलं आहे. त्याच बरोबर राज्यातील विकास कामांवर मोहर उठवत त्यांनी यादीत 16 स्थान पटकावले आहे.
शक्तीशाली (प्रभावशाली) लोकांच्या यादीत पंतप्रधान नरेंद्र मोदी पहिल्या स्थानावर आहेत. जगातल्या दुसऱ्या क्रमांकाच्या लोकसंख्येला कोरोना काळात नियमांचे पालन करण्यास भाग पाडण्यापासून, कोरोना प्रतिबंधक लसीकरणाच्या विक्रमापर्यंत नरेंद्र मोदींनी देशातल्या राजकारणावर आपली छाप सोडली आहे. दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल 9 व्या तर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे या यादीत 16 व्या क्रमांकावर आहेत.
पंतप्रधान मोदींच्या खालोखाल दुसऱ्या क्रमांकावर केंद्रीय गृहमंत्री अमित शाह, तिसऱ्या क्रमांकावर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत आहेत. भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष जे पी नड्डा हे चौथ्या क्रमांकावर आहेत. तर प्रसिद्ध उद्योगपती मुकेश अंबानी या यादीत पाचव्या क्रमांकावर आहेत. उत्तर प्रदेशात बहुमताच्या आधारावर सलग दुसऱ्यांदा मुख्यमंत्री पदावर विराजमान झालेले योगी आदित्यनाथ सहाव्या क्रमांकावर असून उद्योगपती गौतम अदानी यांना सातव्या क्रमांकावर स्थान मिळाले आहे. राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार (NSA) अजित डोवाल हे आठव्या क्रमांकावर आहेत, तर दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल नवव्या क्रमांकावर आहे. देशाच्या अर्थंमंत्री निर्मला सीतारामण यांनाही 100 प्रभावशाली लोकांच्या यादीत पहिल्या 10 मध्ये स्थान मिळाले असून त्या दहाव्या क्रमांकावर आहेत.
देशात तगड्या बहुमताच्या आधारावर केंद्रात असलेल्या मोदी सरकारच्या विरोधात सशक्तपणे लढा देणाऱ्या पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी 22 वरून 11 व्या क्रमांकावर झेप घेतली आहे. सरन्यायाधीश एन व्ही रमण 12 व्या क्रमांकावर आहेत.
प्रभावशाली ( शक्तीशाली ) हिंदुस्थानींच्या यादीत महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे 16 व्या स्थानावर असून राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार 17 व्या स्थानावर आहेत. महाराष्ट्रात महाविकास आघाडीचं सरकार आणून सत्तांतर घडवून आणणं, तसंच देशभरातल्या भाजपाविरोधी पक्षांची मोट बांधणं यात शरद पवारांची प्रमुख भूमिका मानली जाते. त्यामुळे देशाच्या राजकारणात त्यांचे महत्त्व पुन्हा एकदा ठळकपणे समोर आले आहे.












