जळगाव : जिल्ह्यातील पर्यटन स्थळाच्या ठिकाणी पायाभूत सुविधांसाठी निधीला स्थगिती देण्यात आली, मात्र ती आता उठविण्यात आली आहे.
मेहरुण तलावाच्या विकासासाठी पाच कोटी मंजूर करण्यात आले आहे.
आमदार सुरेश भोळे यांनी प्रयत्न करून ही स्थगिती उठविली असल्याचे भाजपचे मनपा उपगटनेते राजेंद्र पाटील यांनी सांगितले.
या बाबत दिलेल्या पत्रकात त्यांनी म्हटले आहे, कि सन २०२२-२३ मध्ये जिल्ह्यातील पायाभूत सुविधा पुरविण्यासाठी प्रादेशिक पर्यटन योजनेंतर्गत सन २०२२ -२३ मध्ये जिल्ह्यातील कामा २८ जून २०२२ प्रशासकीय मान्यता देवून निधी उपलब्ध करून देण्यात आलेला होता.
मात्र प्रशासनामार्फत स्थगिती देण्यात आली होती. मात्र जिल्ह्यातील पर्यटन क्षेत्रांचे सौदर्य वाढविण्यासाठी विकासाची कामे लवकर व्हावीत यासाठी निधीवरील स्थगिती उठविण्याची मागणी केली होती.
त्यानुसार मंगलप्रभात लोढा यांनी स्थगिती उठविण्याचा निर्णय घेतला. शहरातील मेहरुण तलाव परिसरातील रस्ते बांधणे, वाहनतळ, जॉगिंग ट्रॅक,फ्लॉवर बेड, संरक्षण भिंत व बसण्याची व्यवस्था करण्यासाठी पाच कोटी रुपये निधीचा समावेश करण्यात आला आहे.











