नशिराबाद येथील भवानी नगरात घराच्या हौदात पडून तीन वर्षीय चिमुकलीचा दुर्दैवी मृत्यू !

0
3

प्रतिनिधी – जितेंद्र काटे 

भुसावळ – सुनसगाव येथून जवळच असलेल्या नशिराबाद येथील भवानीनगर परिसरात रविवारी दि.५ जुलै रोजी घडलेल्या दुर्दैवी घटनेमुळे संपूर्ण परिसरात शोककळा पसरली आहे. घराच्या आवारात खेळत असलेल्या अवघ्या तीन वर्षांच्या कुमारी आकांक्षा प्रवीण (आबा) इंगळे हिचा पाण्याच्या हौदात पडून दुर्दैवी मृत्यू झाला. या घटनेने इंगळे कुटुंबासह परिसरातील नागरिकांमध्ये हळहळ व्यक्त होत आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, रविवारी दुपारच्या सुमारास आकांक्षा नेहमीप्रमाणे घराच्या अंगणात खेळत होती. त्यावेळी घरातील सदस्य जेवणासाठी बसले होते. खेळण्याच्या नादात तिचा तोल जाऊन ती घरातील पाण्याने भरलेल्या हौदात पडल्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे. काही वेळ ती घरात दिसून न आल्याने कुटुंबीयांनी तिचा परिसरात शोध सुरू केला. शोधादरम्यान ती हौदामध्ये आढळून आली.

कुटुंबीयांनी तातडीने तिला हौदातून बाहेर काढून उपचारासाठी जवळील रुग्णालयात दाखल केले. मात्र, वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासणीनंतर तिला मृत घोषित केले. या घटनेमुळे इंगळे कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला असून भवानीनगर परिसरात शोकमय वातावरण निर्माण झाले आहे.

विशेष म्हणजे, आकांक्षाचा तिसरा वाढदिवस काही दिवसांपूर्वीच, १ जुलै रोजी, कुटुंबीयांनी मोठ्या उत्साहात साजरा केला होता. वाढदिवसाचा आनंद आणि आठवणी ताज्या असतानाच नियतीने घात केलेल्या या घटनेने कुटुंबीय, नातेवाईक आणि परिसरातील नागरिकांना मोठा धक्का बसला आहे.

घटनेची माहिती मिळताच बौद्ध पंच मंडळाचे अध्यक्ष विनोद रंधे यांनी घटनास्थळी भेट देऊन कुटुंबीयांचे सांत्वन केले. तसेच पुढील आवश्यक कार्यवाहीसाठी सहकार्य केल्याची माहिती मिळाली.

दरम्यान, या दुर्दैवी घटनेमुळे लहान मुलांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. घराच्या परिसरातील पाण्याचे हौद, टाक्या, विहिरी व इतर धोकादायक ठिकाणी आवश्यक सुरक्षाव्यवस्था करणे, तसेच लहान मुले खेळत असताना पालकांनी अधिक सतर्क राहणे गरजेचे असल्याचे मत नागरिकांकडून व्यक्त करण्यात येत आहे.

या हृदयद्रावक घटनेमुळे भवानीनगर परिसरात सर्वत्र हळहळ व्यक्त होत असून ग्रामस्थांकडून इंगळे कुटुंबीयांप्रती शोकसंवेदना व्यक्त करण्यात येत आहेत.

Spread the love