यावल, प्रतिनिधी : यावल तालुक्यातील किनगाव शिवारात घडलेल्या एका हृदयद्रावक घटनेने संपूर्ण जिल्हा हादरला आहे. सुरुवातीला अपघात म्हणून नोंद झालेल्या या प्रकरणाला पोलिसांच्या तपासानंतर धक्कादायक वळण मिळाले असून, साडेतीन वर्षांच्या अंध मुलाच्या मृत्यूप्रकरणी त्याची आजी आणि वडिलांविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
१३ जुलै रोजी सकाळी साडेआठ वाजेच्या सुमारास किनगाव येथील शेतातील विहिरीत सरस्वती स्वप्निल पाटील (वय २७) आणि त्यांचा साडेतीन वर्षांचा मुलगा कृष्णा पडल्याची घटना घडली होती. कृष्णा याला सुमारे ७० टक्के दृष्टिदोष होता. या घटनेत सरस्वती या विहिरीतील लाकडी आधाराला धरून बचावल्या, मात्र कृष्णाचा पाण्यात बुडून दुर्दैवी मृत्यू झाला.
सुरुवातीला ही घटना अपघात असल्याचे मानले जात होते. मात्र मुलाच्या अंत्यसंस्कारानंतर पोलिसांनी केलेल्या सखोल चौकशीत नवीन माहिती समोर आली. सरस्वती पाटील यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, विहिरीच्या पूजेसाठी गेले असताना त्यांची सासू आशाबाई पाटील यांनी त्यांना व मुलाला विहिरीत ढकलले. या कृत्यात पती स्वप्निल पाटील यांचाही सहभाग असल्याचा आरोप त्यांनी केला आहे.
तक्रारीनुसार, फिर्यादी आणि त्यांचे पती दोघेही दृष्टिहीन आहेत. गर्भावस्थेदरम्यान जन्माला येणारे अपत्यही दृष्टिदोषग्रस्त असू शकते, अशी माहिती डॉक्टरांनी दिली होती. त्यावेळी गर्भपात करण्याचा आग्रह करण्यात आल्याचे तसेच मुलाच्या जन्मानंतर कौटुंबिक वाद वाढल्याचेही तक्रारीत नमूद करण्यात आले आहे.
या प्रकरणी यावल पोलीस ठाण्यात खून आणि आईला ठार मारण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दोन्ही आरोपींना ताब्यात घेतले असून पुढील तपास सुरू आहे.
या घटनेमुळे परिसरात मोठी खळबळ उडाली असून, निष्पाप चिमुकल्याच्या मृत्यूमुळे हळहळ व्यक्त केली जात आहे.












