करंज जि.प. शाळेत विद्यार्थ्यांना मोफत लेखन साहित्याचे वाटप

0
4

जळगाव, प्रतिनिधी : जळगाव जिल्ह्याचे पालकमंत्री तथा राज्याचे मंत्री ना. गुलाबराव पाटील आणि माजी जिल्हा परिषद सदस्य प्रतापभाऊ गुलाबराव पाटील यांच्या वतीने करंज (ता. जि. जळगाव) येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांना मोफत लेखन साहित्याचे वाटप करण्यात आले. दरवर्षीप्रमाणे यावर्षीही राबविण्यात आलेल्या या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले.

ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी आवश्यक साहित्य सहज उपलब्ध व्हावे तसेच त्यांच्या शिक्षणात आर्थिक अडचणी येऊ नयेत, या उद्देशाने हा उपक्रम राबविण्यात आला. नवीन शैक्षणिक वर्षाच्या पार्श्वभूमीवर विद्यार्थ्यांना वह्या व इतर आवश्यक लेखन साहित्याचे वितरण करण्यात आले.

या कार्यक्रमाला करंज-धानोरा ग्रुप ग्रामपंचायतीचे लोकनियुक्त सरपंच समाधानभाऊ सपकाळे, उपसरपंच वासुदेवभाऊ सपकाळे, शाळा व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षा सौ. अनिता भगवान सपकाळे तसेच समितीच्या सदस्या सौ. किरण सपकाळे यांची प्रमुख उपस्थिती होती. त्यांच्या हस्ते विद्यार्थ्यांना लेखन साहित्याचे वितरण करण्यात आले.

नवीन साहित्य मिळाल्याने विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर आनंद झळकत होता. या विद्यार्थीहिताच्या उपक्रमाबद्दल शाळा व्यवस्थापन समिती, ग्रामपंचायत सदस्य, ग्रामस्थ आणि शिक्षकवृंद यांनी ना. गुलाबराव पाटील व प्रतापभाऊ पाटील यांचे आभार मानले.

या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याची मदत मिळण्याबरोबरच शिक्षणाबद्दल अधिक प्रेरणा मिळाल्याची भावना उपस्थितांनी व्यक्त केली.

Spread the love