उच्चशिक्षित तरुण ड्रग्ज तस्करीत अटकेत; २५ हजारांचे एमडी जप्त

0
2

जळगाव | प्रतिनिधी

शहरातील शिवकॉलनी परिसरातील हॉटेल मातोश्रीसमोर ड्रग्जची विक्री करण्यासाठी आलेल्या एका उच्चशिक्षित तरुणाला रामानंदनगर पोलिसांनी मध्यरात्री सापळा रचून अटक केली. आरोपीकडून ५ ग्रॅम मॅफेड्रॉन (एमडी) ड्रग्ज जप्त करण्यात आले असून एकूण ७५ हजार रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे.

अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव कल्पेश सतीश रायसिंग (वय २६, रा. शेंदणी वालकी, ता. चोपडा, जि. जळगाव) असे आहे. पोलिसांना मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे पोलीस निरीक्षक मधुकर साळवे यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक संजय शेलार व त्यांच्या पथकाने मध्यरात्री सुमारे दोन वाजता कारवाई केली.

संशयित तरुणाच्या अंगझडतीत आणि दुचाकीच्या सीटखाली प्लास्टिकच्या पुडीत पांढऱ्या रंगाची पावडर आढळून आली. फॉरेन्सिकच्या प्राथमिक तपासणीत ती एमडी अंमली पदार्थ असल्याचे स्पष्ट झाले. पोलिसांनी आरोपीविरुद्ध रामानंदनगर पोलीस ठाण्यात एनडीपीएस कायद्यान्वये गुन्हा दाखल केला आहे.

उच्चशिक्षित असूनही ड्रग्जच्या विळख्यात

पोलिस तपासात आरोपी हा उच्चशिक्षित असल्याचे समोर आले. त्याने दहावीत ८९ टक्के गुण मिळवले होते. त्यानंतर सिव्हिल डिप्लोमा पूर्ण करून पुण्यातून बी.ई. (अभियांत्रिकी) पदवी घेतली. उच्चशिक्षित तरुणही अंमली पदार्थांच्या तस्करीच्या विळख्यात अडकत असल्याचे या घटनेतून समोर आले आहे.

शहरात एमडी ड्रग्जचे वाढते जाळे

जळगाव शहरात एमडी ड्रग्जची विक्री वाढत असून महाविद्यालयीन युवकांमध्ये त्याचे प्रमाण चिंताजनकरीत्या वाढत असल्याची बाब पुन्हा एकदा या कारवाईतून अधोरेखित झाली आहे. या प्रकरणाचा पुढील तपास रामानंदनगर पोलीस करीत आहेत.

Spread the love