देवगिरी बँक प्रकरणात माजी खासदार उन्मेष पाटील यांच्या मेव्हण्याला बेड्या !

0
4

देवगिरी नागरी सहकारी बँकेची ५.३३ कोटी रुपयात फसवणूक केल्याप्रकरणी शिवसेना शिंदे गटाचे नेते माजी खा. उन्मेष पाटील यांचे मेव्हणे प्रशांत राजेंद्र वाघ (रा. चाळीसगाव) यांना आर्थीक गुन्हे शाखेच्या पथकाने चाळीसगाव येथून अटक केली. त्यामुळे राजकीय वर्तुळात खळबळ माजून गेली आहे. न्यायालयाने त्यांना दि.३० मे पर्यंत चार दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.

उमंग व्हाईट गोल्ड प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीच्या नावाने घेतलेले औद्योगिक कर्ज न भरल्याने ते एनपीए झाले होते. बँकेकडून संधी देऊनही परतफेड न केल्याने बँकेने कार्यवाही सुरू केली. मात्र, या दरम्यान बँकेकडे गहाण ठेवलेली मशिनरी कंपनीच्या संचालकांनी बँकेची परवानगी न घेता, संगनमताने विकल्याचा आरोप करण्यात आला आहे. त्यानुसार बँकेच्या चाळीसगाव शाखेचे व्यवस्थापक जीवन राजूरकर यांनी दिलेल्या फिर्यादीवरून शिवसेना शिंदे गटाचे नेते माजी खा. उन्मेष पाटील, संजय धनकवडे, प्रशांत वाघ आणि प्रमोद जाधव यांच्या विरोधात फसवणुकीसह विविध कलमान्वये चाळीसगाव ग्रामीण पोलिसात गुन्हा नोंदवण्यात आला होता. त्यानंतर पोलीस अधीक्षकांच्या आदेशानुसार तो गुन्हा आर्थीक गुन्हे शाखेकडे वर्ग करण्यात आला होता.

गुन्हा दाखल झाल्यानंतर माजी खा. उन्मेष पाटील यांच्यासह संजय धनकवडे, प्रमोद जाधव व प्रशांत वाघ यांचा टकपूर्व जामीन जिल्हा न्यायालयाने फेटाळून लावल्यानंतर त्यांनी हायकोर्टात अर्ज केला होता. प्रशांत वाघ वगळता तिघांना न्यायालयाने अंतरीम जामीन मंजूर केल्यामुळे प्रशांत वाघ यांच्यावर अटकेची टांगती तलवार होती. पोलिसांकडून त्यांचा शोध सुरु होता, परंतू ते मिळून येत नव्हते.

संशयित प्रशांत वाघ यांना अटक केल्यानंतर त्यांना जळगाव येथील आर्थीक गुन्हे शाखेच्या पोलीस ठाण्यात आणले. त्यानंतर बुधवार दि. २७ मे रोजी वाघ यांना न्यायालयात हजर केले असता, न्यायालयाने त्यांना दि. ३० मे पर्यंत पोलीस कोठडी सुनावली.

Spread the love