लाच मागणाऱ्या पोलीस उपनिरीक्षकासह खासगी इसम एसीबीच्या जाळ्यात

0
2

भुसावळ – : बाजारपेठ पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या गुन्ह्यात अटक न करता मदत करण्याच्या मोबदल्यात ३० हजार रुपयांची लाच मागणाऱ्या पोलीस उपनिरीक्षकासह एका खासगी इसमाविरुद्ध लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने कारवाई केली आहे. या कारवाईमुळे पोलीस दलात एकच खळबळ उडाली आहे.

लाचलुचपत प्रतिबंधक विभाग यांनी दिलेल्या माहितीनुसार, नेमणूक भुसावळ बाजारपेठ पोलीस स्टेशन येथे असलेले पोलीस उपनिरीक्षक राजू सांगळे (वय ५२) आणि सलिम हकीम कुरेशी (रा. बोदवड, खासगी इसम) यांच्याविरुद्ध ही कारवाई करण्यात आली. तक्रारदार व त्यांच्या मित्राविरुद्ध भुसावळ बाजारपेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. या गुन्ह्यात अटक न करण्यासाठी तसेच प्रकरणात मदत करण्याच्या मोबदल्यात आरोपींनी तक्रारदाराकडे ३० हजार रुपयांची मागणी केली होती. त्यानंतर तडजोडीअंती २० हजार रुपये स्वीकारण्याचे ठरल्याचे एसीबी तपासात निष्पन्न झाले.

तक्रारदाराने याबाबत जळगाव लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दाखल केली होती. तक्रारीची पडताळणी करण्यात आल्यानंतर सापळा रचण्यात आला. या कारवाईदरम्यान खासगी इसम सलिम कुरेशी याने तक्रारदाराकडे २० हजार रुपयांची मागणी करून ती स्वीकारण्याची तयारी दर्शविल्याचे निष्पन्न झाले. त्यानुसार दोघांविरुद्ध भ्रष्टाचार प्रतिबंधक अधिनियम १९८८ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

ही कारवाई पोलीस उपअधीक्षक योगेश ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक सिमता नवघरे, पोलीस निरीक्षक हेमंत नागरे तसेच एसीबीच्या पथकाने केली. पुढील तपास पोलीस निरीक्षक हेमंत नागरे करीत आहेत.

Spread the love