प्राजक्त तनपुरे पाठोपाठ मंत्री गुलाबराव पाटील पण भाजपच्या वाटेवर 

0
2

जळगाव -: विधान परिषद स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघ निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महायुतीतील जागावाटपाचा तिढा जळगावमध्ये अधिकच चर्चेत आला आहे. जळगावची जागा भाजपच्या वाट्याला गेल्याची माहिती समोर येताच शिवसेना शिंदे गटातील अस्वस्थता वाढल्याची चर्चा सुरू झाली आहे. पालकमंत्री आणि त्यांचे पुत्र प्रताप पाटील यांनी या जागेसाठी जोरदार दावा केला होता तसेच प्रताप पाटील यांच्या उमेदवारीसाठी पक्षश्रेष्ठींकडे पाठपुरावा करण्यात आला होता. मात्र उत्तर महाराष्ट्रातील राजकीय बळकटी कायम ठेवण्याच्या उद्देशाने भाजपने ही जागा सोडण्यास नकार दिल्याचे सांगितले जात आहे. यामुळे शिंदे गटाच्या अपेक्षांवर पाणी फिरल्याचे मानले जात आहे. दरम्यान, जागा न मिळाल्यास गुलाबराव पाटील आणि प्रताप पाटील भाजपमध्ये प्रवेश करू शकतात, अशा चर्चांनाही वेग आला आहे. या पार्श्वभूमीवर गुलाबराव पाटील यांनी आपण गेली ४५ वर्षे शिवसेनेत असून सध्या शिवसेनेचे मंत्री असल्याचे स्पष्ट करत पक्षांतराच्या चर्चांना थेट दुजोरा दिलेला नाही. तसेच जळगाव जागेबाबत उपमुख्यमंत्री यांच्याशी चर्चा झाल्याचे सांगून अंतिम निर्णय महायुतीच्या प्रमुख नेत्यांकडून घेतला जाईल, असे त्यांनी स्पष्ट केले. त्यामुळे जळगावच्या राजकारणाकडे राज्याचे लक्ष लागले आहे.

Spread the love