रेल्वे लोखंड चोरीच्या वादातून संतोष मंचल यांचा खून; तिघांना अटक

0
2

भुसावळ :- शहर पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या खून प्रकरणाचा उलगडा करण्यात पोलिसांना यश आले असून, रेल्वेचे लोखंड चोरी करण्याच्या उद्देशाने गेलेल्या तिघांनी वादातून एका व्यक्तीला बेदम मारहाण करून ठार केल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गुन्हा क्रमांक 145/2026, भारतीय न्याय संहिता (BNS) कलम 103(1) अन्वये मयत संतोष रघुवीर मंचल (वय 55) यांच्या खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. दिनांक 28 जून 2026 रोजी रात्री अज्ञात व्यक्तींनी संतोष मंचल यांना तोंडावर, छातीवर तसेच हाताबुक्क्या व लाथांनी मारहाण करून गंभीर जखमी केले होते. या मारहाणीत त्यांचा मृत्यू झाला होता.

घटनेचा तपास करताना पोलिसांनी संशयितांना ताब्यात घेऊन कसून चौकशी केली. चौकशीत आरोपी नामे क्षितिज संजय भालेराव (रा. ZTC, भुसावळ), प्रफुल उत्तम जाधव (रा. कोळीवाडा, जुना सातारा, भुसावळ) आणि हर्षल राजू वर्मा (रा. ZTC, भुसावळ) यांची नावे समोर आली.

पोलिसांच्या माहितीनुसार, 28 जूनच्या रात्री आरोपी रेल्वेचे लोखंड चोरी करण्याच्या उद्देशाने गेले होते. त्यावेळी त्यांचा संतोष मंचल यांच्याशी वाद झाला. वादाचे रूपांतर भांडणात झाल्यानंतर रागाच्या भरात आरोपींनी संतोष मंचल यांना बेदम मारहाण केली. या मारहाणीत गंभीर दुखापत झाल्याने त्यांचा मृत्यू झाला.

सदर गुन्ह्याची आरोपींनी कबुली दिली असून, त्यांना ताब्यात घेण्यात आले आहे. या प्रकरणाचा अधिक तपास भुसावळ शहर पोलीस करीत आहेत.

Spread the love