यावल | फैजपूर रोडवरील महेंद्र ढाबा येथे गुरुवारी रात्री एक हृदयद्रावक घटना उघडकीस आली. ढाब्याचे व्यवस्थापक म्हणून काम पाहणारे भरत ज्ञानेश्वर वानखेडे (वय २७) यांनी ढाब्यातच गळफास घेऊन जीवन संपवल्याची घटना समोर आली आहे.
घटनेची माहिती मिळताच परिसरात एकच खळबळ उडाली. रात्रीच्या वेळी ढाब्यावर कोणीही नसताना भरत यांनी हे टोकाचे पाऊल उचलल्याचे बोलले जात आहे.
भरत वानखेडे हे यावल शहरातील हरिओम नगर येथील रहिवासी होते. अत्यंत शांत व मनमिळावू स्वभावामुळे त्यांची शहरात ओळख होती. मागील वर्षीच त्यांचा विवाह झाला होता. त्यांच्या पश्चात आई-वडील, पत्नी आणि दोन भाऊ असा परिवार आहे.
या घटनेमुळे यावल शहरात शोककळा पसरली असून तरुण वर्गातून हळहळ व्यक्त होत आहे. आत्महत्येमागील कारण अद्याप अस्पष्ट असून यावल पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.











