सुनसगाव विद्यालयातील विद्यार्थी विजेच्या धक्क्याने जखमी; सुदैवाने बचाव

0
9

भुसावळ, प्रतिनिधी जितेंद्र काटे : तालुक्यातील सुनसगाव येथील दादासाहेब दामू पांडू पाटील माध्यमिक विद्यालयात शिकणारा इयत्ता सहावीचा विद्यार्थी आर्यन राहुल कोळी (रा. गोंभी) हा विजेच्या धक्क्यामुळे जखमी झाल्याची घटना ३० जून रोजी दुपारच्या सुमारास घडली.

मिळालेल्या माहितीनुसार, महिना अखेर असल्याने काही विद्यार्थी शाळेबाहेर खेळत होते. त्यावेळी आर्यन कोळी हा शाळेजवळील एका टपरीमागे असलेल्या लोखंडी वीजखांबाला हात लावून फिरण्याचा प्रयत्न करत असताना अचानक वीजप्रवाहाच्या संपर्कात आला. खांबामध्ये वीजप्रवाह असल्याने तो त्यास चिकटून राहिला. प्रसंगावधान राखत एका महिलेने त्याला वाचविण्याचा प्रयत्न केला, मात्र तिलाही विजेचा धक्का बसला. त्यानंतर इतर नागरिकांनी प्रयत्न केल्यानंतर आर्यन खांबापासून दूर फेकला गेला.

घटनेची माहिती मिळताच विद्यालयातील शिक्षकांनी तत्काळ विद्यार्थ्याला उपचारासाठी डॉक्टरांकडे नेले. सध्या त्याची प्रकृती स्थिर असून तो धोक्याबाहेर असल्याची माहिती मिळाली आहे.

या संदर्भात महावितरणच्या कर्मचाऱ्यांशी संपर्क साधला असता, पावसाळ्यातील ओलाव्यामुळे काही वेळा वीजखांब किंवा अर्थिंगमध्ये किरकोळ वीजप्रवाह निर्माण होऊ शकतो. त्यामुळे हा प्रकार घडला असावा, असे त्यांनी सांगितले.

घटनेनंतर विद्यालयाजवळील रहिवासी शिवाजी पाटील यांनी गावातील उद्योजक व दुग्धव्यवसायिक विशाल पाटील यांच्या सहकार्याने मोठा पीव्हीसी पाईप आणून संबंधित वीजखांबाला संरक्षणात्मक आवरण बसविले.

दरम्यान, विद्यालयात प्रवेश केल्यानंतर प्रवेशद्वार बंद ठेवण्याची पद्धत असली तरी महिना अखेर असल्याने काही विद्यार्थी बाहेर असल्याचे सांगण्यात आले.

पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर नागरिकांनी तसेच लहान मुलांनी वीजखांब, अर्थिंगच्या तारा आणि विद्युत उपकरणांपासून सुरक्षित अंतर राखावे. तसेच वीजखांब किंवा अर्थिंगच्या तारांना गुरेढोरे बांधू नयेत, असे आवाहन सुनसगाव महावितरणच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांनी केले आहे.

Spread the love