दारूच्या नशेत रस्त्यावर पडल्याने तरुणाचा दुर्दैवी मृत्यू; घातपाताचा संशय फेटाळला

0
3

जळगाव, दि. २२ जून — शहरातील शिवकॉलनी ते आशाबाबा नगर मार्गावर रस्त्याच्या कडेला रक्तबंबाळ अवस्थेत आढळलेल्या एका तरुणाच्या मृत्यूमुळे परिसरात खळबळ उडाली होती. सुरुवातीला घातपात झाल्याचा संशय व्यक्त केला जात असला तरी पोलिसांच्या प्राथमिक तपासात हा मृत्यू दारूच्या नशेत पडल्याने झाल्याचे समोर आले आहे.

मृत तरुणाचे नाव ज्ञानेश्वर बारकू नारळे (वय २७, रा. खंडेरावनगर) असे आहे. तो दोन दिवसांपूर्वीच बाहेरगावी राहत असलेल्या नातेवाईकांकडून आई-वडिलांना भेटण्यासाठी जळगाव येथे आला होता.

माहितीनुसार, रविवारी (दि. २१ जून) रात्री ज्ञानेश्वरने अतिमद्य सेवन केले होते. त्यानंतर तो शिवकॉलनीकडून आशाबाबा नगरकडे जात असताना रस्त्याच्या कडेला त्याचा तोल जाऊन तो चेहऱ्यावर पडला. या अपघातात त्याच्या चेहऱ्याला गंभीर दुखापत झाली. परिसरात रात्री अंधार असल्याने तो रात्रभर तेथेच रक्तबंबाळ अवस्थेत पडून राहिला आणि कोणाच्याही निदर्शनास आला नाही.

सोमवारी सकाळी नागरिकांना रस्त्याच्या कडेला एक व्यक्ती रक्ताच्या थारोळ्यात पडलेली दिसून आली. त्यांनी तत्काळ रामानंद नगर पोलिसांना माहिती दिली. माहिती मिळताच पोलीस उपनिरीक्षक संजय तडवी व त्यांच्या पथकाने घटनास्थळी धाव घेतली.

मयताच्या चेहऱ्यावर गंभीर जखमा असल्याने सुरुवातीला घातपाताचा संशय व्यक्त करण्यात आला. मात्र पोलिसांनी घटनास्थळाची पाहणी, माहिती संकलन आणि चौकशी केल्यानंतर प्राथमिक तपासात ज्ञानेश्वर हा दारूच्या नशेत असताना रस्त्यावर पडल्याचे स्पष्ट झाले.

परिसरातील नागरिकांनी मयताची ओळख पटविल्यानंतर त्याचे आई-वडील घटनास्थळी दाखल झाले. त्यानंतर मृतदेह शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात हलविण्यात आला. तेथे वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्याला मृत घोषित केले.

पोलिसांच्या प्राथमिक अंदाजानुसार, ज्ञानेश्वर तोंडावर आपटल्याने गंभीर जखमी झाला होता. तसेच पडताना त्याचे दोन्ही हात शरीराखाली अडकल्याने त्याला हालचाल करणे शक्य झाले नाही. त्यामुळेच तो रात्रभर मदतीअभावी पडून राहिला आणि त्याचा मृत्यू झाला असावा.

दरम्यान, मृतदेह जिल्हा रुग्णालयात आणल्यानंतर ज्ञानेश्वरचे मामा रवी मोरे यांनी घातपाताची शक्यता व्यक्त केली आहे. त्यामुळे पोलिसांकडून सर्व बाजूंनी तपास सुरू असून, रामानंद नगर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

जळगाव संदेश | प्रतिनिधी “मृत्यूचे नेमके कारण शवविच्छेदन अहवालानंतर स्पष्ट होणार असून पोलिसांचा पुढील तपास सुरू आहे.”

Spread the love