जळगाव – बाजार समिती निवडणुकांसाठी विविध पक्ष किंवा आघाड्यांनी प्रचार सुरू केला आहे. पण पॅनेलमध्ये नेमके उमेदवार कोण, हे कोडे अपवाद वगळता कुठेही सुटलेले नाही. माघारीनंतरच उमेदवारांची अंतिम यादी येईल, असे दिसत आहे.
आतापासून उमेदवार निश्चित केल्यास पुढे बंडखोरी होईल. त्याचा लाभ विरोधक घेतील, अशी भीती नेत्यांना आहे. नावे आहेत, पण थोडे थांबा, अशी प्रतिक्रिया विविध पक्षाचे नेते देत आहेत.
जळगावात युती व महाविकास आघाडीच्या उमेदवारांची सर्वच नावे समोर आलेली नाहीत. अशीच स्थिती धरणगाव, अमळनेर, जामनेर, रावेर, यावल, चोपडा, धुळ्यातील धुळे, शिरपूर, दोंडाईचा (ता. शिंदखेडा), नंदुरबार व शहादा येथेही आहे. नेते मेळावे घेत आहेत.
बैठका घेऊन कार्यकर्त्यांची समजूत घालणे व पुढील रणनीती तयार करीत आहेत. परंतु उमेदवार कोण आहेत, हे स्पष्ट झालेले नाही. मेळाव्यांत सर्वच इच्छुक उमेदवार हजेरी लावत आहेत. पण आपली उमेदवारी अंतिम असेल का, याची खात्री इच्छुक असलेल्या उमेदवारांनादेखील नाही.
यामुळे सर्वच पक्षांमध्ये गोंधळाची स्थिती आहे. जातीय समीकरणांसाठी निष्ठावंत कार्यकर्त्यांवर अन्याय होत असल्याचा मुद्दाही जळगाव, धुळे, धरणगाव व नंदुरबारात चर्चेत आहे. विजयी होण्याची क्षमता लक्षात न घेता जातीय समीकरण जुळविण्यासाठी काही उमेदवारांची नावे नेत्यांनी पुढे केल्याने नाराजीदेखील आहे.
आव्हाण्याला युतीच्या पॅनेलमध्ये संधी नाही
आव्हाणे गावातून जळगावात शिंदे गट आणि महाविकास आघाडी समर्थकांनी अर्ज दाखल केले होते. परंतु शिंदे गट किंवा भाजप-सेनेच्या पॅनेलमध्ये उमेदवारीसाठी या गावातील कुण्याही कार्यकर्त्याला संधी मिळाली नसल्याची माहिती मिळाली.
स्वकियांकडून अफवांचा बाजार
जळगाव, अमळनेर व धरणगाव येथे महाविकास आघाडी व युतीमध्ये काही कार्यकर्ते उमेदवारीवरून नाराज आहेत. त्यांच्याबाबत अफवादेखील स्वकियांनी पसरविल्या. उमेदवारी नाकारली, भाऊंनी भेट नाकारली, भाऊंनी फोनच घेतला नाही, अशा अफवा काही स्वकीयच तयार करीत आहेत.
यामुळे पॅनेलमध्ये धुसफूस तयार होत आहे. परिणामी, निवडणुकीत याचा फटका बसू शकतो, असेही जळगावात एका पदाधिकाऱ्याने सांगितले.
पालकमंत्री गुलाबराव पाटील यांना या निवडणुकीत सक्रिय व्हावे लागले. त्यांचे पुत्र प्रताप हे काही दिवस सक्रिय होते. परंतु उमेदवारीसाठी स्पर्धा व माघारीचा अंतिम दिवस लक्षात घेऊन गुलाबराव सक्रिय झाले. त्यांच्या पाळधी (ता. धरणगाव) येथील फार्म हाऊसवर काही अर्ज दाखल केलेल्या कार्यकर्त्यांना बोलाविण्यात आले.
यातच पालकमंत्र्यांची सूचना येण्यापूर्वीच माजी सभापती कैलास चौधरी यांनी माघार घेतली. तर काही नाराज कार्यकर्त्यांची मात्र गुलाबराव यांनी समजूत काढली. पुढील वेळेस संधी देऊ, असे सांगितले.












