अमळनेरमध्ये हृदयद्रावक दुर्घटना पाण्याने भरलेल्या खड्ड्यात बुडून तीन अल्पवयीन मुलांचा मृत्यू

0
2

अमळनेर, प्रतिनिधी : अमळनेर शहरातील चोपडा रोडवरील उड्डाण पुलाजवळ पाण्याने भरलेल्या खड्ड्यात बुडून तीन अल्पवयीन मुलांचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना घडली आहे. या घटनेमुळे संपूर्ण अमळनेर शहरावर शोककळा पसरली असून सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे.

मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, सिंधी कॉलनी परिसरात राहणारे तिघे मित्र पोहण्यासाठी उड्डाण पुलाजवळील पाण्याने भरलेल्या खड्ड्याकडे गेले होते. पोहत असताना ते खोल पाण्यात बुडाल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात येत आहे.

घटनेची माहिती मिळताच स्थानिक नागरिकांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेत बचावकार्य सुरू केले. तिघा मुलांना पाण्याबाहेर काढून तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासणीनंतर तिघांनाही मृत घोषित केले.

मृत मुलांमध्ये मानव रत्नानी, दिनेश पंजवानी आणि कार्तिक उधवानी (सर्व रा. सिंधी कॉलनी, अमळनेर) यांचा समावेश असल्याची माहिती समोर आली आहे.

घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून पुढील तपास सुरू आहे. या दुर्घटनेचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झाले नसले तरी पावसाळ्यात पाण्याने भरलेले खड्डे, तलाव आणि इतर धोकादायक ठिकाणी जाणे टाळावे, असे आवाहन प्रशासन व नागरिकांकडून करण्यात येत आहे.

या दुर्दैवी घटनेमुळे अमळनेर शहरात शोक व्यक्त केला जात असून मृत मुलांच्या कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.

– जळगाव संदेश 📰

Spread the love