जमीन नावावर करत नाही, पैसेही देत नाही या कारणातून मुलाने वडिलांना ट्रॅक्टरखाली चिरडून ठार मारले. ही धक्कादायक घटना सांगली जिल्ह्यातील मिरत तालुक्यातील बेडी येथे बुधवारी सकाळी घडली. दाजी गजानन आकळे (वय – 70) असे मृताचे नाव असून याप्रकरणी पोलिसांनी मुलगा लक्ष्मण आकळे (वय – 32) याला अटक केली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, लक्ष्मण आकळे याचे वडील दाजी आकळे यांच्यामध्ये गेल्या काही दिवसांपासून पैसे आणि जमीन नावावर करण्याच्या कारणावरून वाद सुरू होता. लक्ष्मण वडिलांकडे वारंवार पैशांची मागणी करीत होता. तसेच जमीन नावावर करण्यासाठी वडिलांकडे तगादा लावला होता. पैसे देण्यास तसेच जमीन नावावर करून देण्यास वडिलांनी विरोध केल्याने लक्ष्मण याने बुधवारी रागाच्या भरात वडिलांना ट्रॅक्टर खाली चिरडून ठार मारले.
दरम्यान, हा प्रकार उघड होताच समजताच एकच गोंधळ उडाला. तातडीने पोलिसांना पाचारण करण्यात आले. मिरज ग्रामीण पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत वडिलांना ठार मारणाऱ्या मुलाला अटक केली. या प्रकरणी मिरज ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.











