आषाढी एकादशीच्या सोहळय़ासाठी जाताना अपघात; बोलेरो उलटून एक ठार, सातजण जखमी

0
38

आषाढी एकादशीच्या सोहळय़ासाठी पंढरपूरला श्री विठ्ठलाच्या दर्शनासाठी निघालेल्या भाविकांची बोलेरो उलटून झालेल्या अपघातात एकाचा मृत्यू झाला, तर 7 जण जखमी झाले. अपघातातील सर्व भाविक कोरेगाव तालुक्यातील गुजरवाडीचे रहिवासी आहेत. गुरुवारी सकाळी आठ वाजता गोंदवले खुर्दनजीक लोधवडे फाटय़ानजीक दुसऱ्या गाडीला ओव्हरटेक करत असताना बोलेरे उलटली.

कल्याण भोसले (वय 45, रा. गुजरवाडी, ता. कोरेगाव) असे अपघातात ठार झालेल्या भाविकाचे नाव आहे. अण्णा गाढवे (वय 42), पप्पू भिसे (वय 40), दादासाहेब थोरात (वय 42), सागर भोसले (वय 45), विजय माने (वय 45), श्रीमंत पवार (वय 50), रुद्र भोसले (वय 13, सर्व रा. गुजरवाडी) हे जखमी झाले आहेत.

आषाढी एकादशीच्या सोहळय़ासाठी गुजरवाडी येथील पैलवान प्रगतशील शेतकरी कल्याण भोसले हे बोलेरो गाडीतून पंढरपूरला विठ्ठलाच्या दर्शनासाठी निघाले होते. त्यांच्यासोबत इतर आठजण गाडीतून प्रवास करत होते. गोंदवले खुर्दनजीक लोधवडे फाटय़ानजीक दुसऱ्या गाडीला ओव्हरटेक करत असताना बोलेरो चारवेळा पलटी होत एका रानात जाऊन पडली. यात सर्व भाविक जखमी झाले होते. अपघाताची माहिती मिळताच, दहिवडी ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक अक्षय सोनवणे यांनी पथकासह घटनास्थळी धाव घेतली. पोलीस पथकाने लोधवडे, संभाजीनगर येथील नागरिकांच्या मदतीने जखमींना गाडीतून बाहेर काढले. जखमींना गोंदवले खुर्द येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. दरम्यान, गेल्या काही महिन्यांपूर्वी पळशी येथील तीन युवकांचा या ठिकाणी अपघात झाला होता. त्यात तिघांचा जागीच मृत्यू झाला होता.

Spread the love