बकरी ईदनिमित्त सोलापुरातील विजापूर रोडवरील ईदगाह मैदानावर नमाज झाल्यावर पाकिस्तानचा झेंडा असलेले फुगे विकणाऱयांची सखोल चौकशी करून मुख्य सूत्रधारांवर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करा, अशा मागणीचे निवेदन शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या वतीने करण्यात आली. या मागणीचे निवेदन पोलीस उपायुक्त विजय कबाडे यांना देण्यात आले.
यावेळी जिल्हाप्रमुख पुरुषोत्तम बरडे, उपजिल्हाप्रमुख प्रताप चव्हाण, विष्णू कारमपुरी, दत्तात्रय कानकर, भीमाशंकर म्हेत्रे, महेश धाराशिवकर, चंद्रकांत मानकी, संदीप बेळमकर, अमित भोसले, रेकण पुराणिक, गुरुनाथ कोळी, नागार्जुन कुसुरकर, बाळासाहेब पवार, किठ्ठल कुराडकर आदी उपस्थित होते.
या निवेदनात म्हटले आहे की, मुस्लिम समाजाचा बकरी ईद सण असल्याने संपूर्ण शहरात नमाज अदा करण्यात आल़े त्यापैकी विजापूर रोडवरील ईदगाह मैदानावर नमाज अदा झाल्यानंतर फुगे विक्री करणाऱया दोघांकडे ‘आय लव पाकिस्तान’, पाकिस्तानचा झेंडा असलेले फुगे होते. हा प्रकार नमाज अदा करण्यास आलेल्या मुस्लिम बांधवांनी पाहून पोलिसांना फोन केला. पोलिसांनी अजय पवार व शिवाजी पवार या दोन फुगेविक्रेत्यांना ताब्यात घेतले. त्यानंतर होलसेल दुकानदार तन्वीर बागवान यालाही अटक केली. हिंदू-मुस्लिम समाजांत तेढ निर्माण करणारा हा प्रकार असल्याचे दिसून येते. या प्रकाराबाबत वरिष्ठ पातळीवर सखोल चौकशी करणे गरजेचे आहे. त्यामुळे मुख्य सूत्रधाराला शोधून त्याच्यावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करावा, अशी मागणी सोलापूर शिवसेनेच्या वतीने निवेदनातून केली आहे.











