केदारनाथ मंदिरात मोबाईल घेऊन जाण्यावर बंदी

0
39

पवित्र चार धामांमधील सर्वात लोकप्रिय असलेल्या केदारनाथ मंदिरामध्ये आता मोबाईल फोनवर बंदी घालण्यात आली आहे. यासोबतच मंदिर परिसरात फोटो आणि व्हिडिओ बनवण्यावर मज्जाव करण्यात आला आहे. त्यामुळे येथे येणाऱ्या भाविकांना आता मंदिर परिसरात फोन वापरता येणार नाही.

काही दिवसांपूर्वा केदारनाथ मंदिर परिसरातील काही व्हिडीओ व्हायरल झाले होते. या व्हायरल व्हिडीओमुळे या धार्मिक स्थळाची पावित्र्य भंग करत भावना दुखावल्या गेल्याचा आरोप करण्यात आला होता. या पार्श्वभूमीवर मंदिर प्रशासनाने हा निर्णय घेतला आहे. एवढेच नाही मंदिर समितीने कपडे घालण्याबाबत नवीन नियम लागू केले आहेत.

श्री बद्रीनाथ-केदारनाथ मंदिर समितीने मंदिर परिसरात ठिकठिकाणी फलक लावले आहेत, ज्यावर मंदिराच्या आवारात मोबाईल फोन घेऊन प्रवेश करू नका, मंदिरात कोणत्याही प्रकारची फोटोग्राफी आणि व्हिडीओग्राफी करण्यास पूर्णपणे मनाई आहे, तुम्ही सीसीटीव्ही कॅमेऱ्यांच्या निगराणीखाली आहात, असे या सूचना फलकांमध्ये सांगण्यात आले आहे.

इतकेच नाही तर मंदिर समितीने केदारनाथला जाणाऱ्या भाविकांना ‘सभ्य कपडे’ परिधान करण्यास सांगितले आहे. तसेच मंदिर परिसरात मंडप किंवा छावण्या न लावण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. या आदेशाचे पालन न करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल, असे मंदिराच्या आवारातील हिंदी आणि इंग्रजी भाषेतील फलकांवरही लिहिले आहे. दरम्यान, केदारनाथ मंदिरात बनवलेले असे अनेक व्हिडिओ सोशल मीडियावर प्रसारित झाले होते, ज्याबद्दल यात्रेकरू, सामान्य भाविक आणि सोशल मीडिया युजर्सनी आक्षेप घेतला होता आणि धार्मिक स्थळांमधील अशा कृत्यांचा निषेध केला होता.

Spread the love