२०२४ च्या लोकसभा निवडणुकीआधी मिझोराम, छत्तीसगड, मध्य प्रदेश, राजस्थान आणि तेलंगणा या राज्यांमध्ये विधानसभेच्या निवडणुकांचे बिगुल वाजले असून या निवडणुकांचे वेळापत्रक निवडणूक आयोगाने आज जाहीर केले. १३ ऑक्टोबरपासून या विधानसभांची निवडणूक प्रक्रिया सुरू केली जाणार असून त्याची मिझोराममधून होणार आहे.
सर्वात अगोदर मिझोराम आणि छत्तीसगडमध्ये विधानसभेसाठी ७ नोव्हेंबर रोजी मतदान घेतलं जाणार आहे. छत्तीसगडमध्ये दोन टप्प्यात निवडणूक प्रक्रिया राबवली जाणार असून ७ नोव्हेंबरला पहिल्या आणि १७ नोव्हेंबरला दुसऱ्या टप्प्यातील मतदान घेतलं जाणार आहे. त्यानंतर मध्य प्रदेश १७ नोव्हेंबर, राज्यस्थान २३ नोव्हेंबर आणि तेलंगणामध्ये ३० नोव्हेंबर रोजी मतदान घेतलं जाणार आहे. या पाचही राज्यांची मतमोजणी ३ डिसेंबर रोजी घेतली जाणार असून ५ डिसेंबरपर्यंत सर्व निवडणूक प्रक्रिया पूर्ण होणार आहे.
२०२३ च्या उत्तरार्धात पाच राज्यामधील ६७९ विधानसभा मतदारसंघात निवडणुक लागणार असून यासाठी सुमारे 1 लाख ७७ हजार मतदान केंद्रे उभारली जाणार आहेत. तसेच ९४० हून अधिक आंतरराज्य सीमेवरील चेक पोस्ट्सवर बेकायदेशीर रोकड, दारू, मोफत वस्तू आणि ड्रग्जच्या तस्करीवर निवडणुक आयोग लक्ष ठेवणार असल्याचेही मुख्य निवडणूक आयुक्तांनी सांगितले.
या पाच राज्यापैकी सध्या मध्य प्रदेशात भाजपची सत्ता आहे, तर छत्तीसगड आणि राजस्थानमध्ये काँग्रेसची सत्ता आहे. तसेच तेलंगाणामध्ये भारत राष्ट्र समिती सत्तेवर असून मिझो नॅशनल फ्रंट (MNF)भाजपची मिझोराममध्ये सत्ता आहे. 2024 ला आपली हॅट्रिक करण्याचा चंग बांधलेल्या भाजपसाठी आणि पक्षाला उभारी देण्यासाठी काँग्रेससाठी या दोन्ही निवडणुका महत्वाच्या आहेत.








