अखेर जी शंका होती तीच खरी ठरली असून मॉडेल-अभिनेत्री पूनम पांडे (वय – 32) हिनेच आपल्या मृत्युची अफवा पसरवल्याचे समोर आले आहे. शनिवारी सकाळी तिने इन्स्टाग्राम अकाऊंटवरून स्वत:चा व्हिडीओ शेअर करत आपण जिवंत असल्याची माहिती दिली.
मॉडेल-अभिनेत्री पूनम पांडे (वय – 32) हिचे गर्भाशयाच्या कर्करोगामुळे कानपूरमध्ये निधन झाल्याच्या बातम्या शुक्रवारी प्रसिद्ध झाल्या. विशेष म्हणजे या वृत्ताला तिची मॅनेजर निकिता शर्मा यांनी दुजोरा दिला होता. मात्र आता ती जिवंत असल्याचे समोर आले आहे. तिने स्वत:चा एक व्हिडीओ इन्स्टाग्रामवर शेअर करत यामागील कारणही स्पष्ट केले आहे. गर्भाशयाच्या कर्करोगाबाबत जागरुकता पसरवण्यासाठी आपण स्वत:च्या मृत्युची बातमी पसरवल्याचे पुनम पांडे म्हणाली.











