ममुराबाद (ता. जि. जळगाव) : गेल्या आठ दिवसांपासून सुरू असलेल्या सततच्या पावसामुळे ममुराबाद गावाशेजारील तलावात मोठ्या प्रमाणात पाणी साचल्याने नागरिकांच्या दैनंदिन जीवनावर परिणाम झाला असून विद्यार्थ्यांचेही शैक्षणिक नुकसान होत असल्याची परिस्थिती निर्माण झाली आहे. गावकऱ्यांनी संबंधित रस्ते बांधकामातील त्रुटींमुळे ही समस्या उद्भवल्याचा आरोप केला असून दोषींवर कारवाईची मागणी केली आहे.
स्थानिकांच्या म्हणण्यानुसार, नुकत्याच झालेल्या जळगाव–किनगाव रस्त्याच्या बांधकामादरम्यान तलावाजवळ पूर्वी अस्तित्वात असलेली पाण्याच्या निचऱ्याची मोरी ठेवण्यात आली नाही. त्यामुळे तलावातील पाण्याचा नैसर्गिक निचरा बंद झाला असून मोठ्या प्रमाणात पाणी साचले आहे. यामुळे नागरिकांना ये-जा करण्यासाठी मोठा अडथळा निर्माण झाला आहे.
या परिसरात जिल्हा परिषद उर्दू शाळा असल्याने शाळेच्या परिसरातही पाणी साचले आहे. परिणामी विद्यार्थ्यांना शाळेत जाणे कठीण झाले असून त्यांच्या शिक्षणावर परिणाम होत असल्याची तक्रार पालकांनी केली आहे.
गावकऱ्यांचा आरोप आहे की, जळगाव–किनगाव रस्त्याच्या कामावेळी डीपीएम मुकेश कुमार पुरे आणि अभियंता इम्रान शेख यांनी आवश्यक असलेली मोरी न बांधता हलगर्जीपणा केला. त्यामुळे आजची गंभीर परिस्थिती निर्माण झाली असून त्याचा फटका सर्वसामान्य नागरिकांना बसत आहे, असा दावा करण्यात आला आहे.
दरम्यान, तलावातील पाणी वाढल्याने वाहतुकीस अडथळा निर्माण झाला आणि विद्यार्थ्यांना शाळेत जाणे अशक्य झाल्यामुळे काही नागरिकांनी घटनास्थळी आंदोलनाचा पवित्रा घेतला. त्यावेळी अभियंता इम्रान शेख यांना घटनास्थळी बोलावण्यात आले होते. गावकऱ्यांचा आरोप आहे की, त्यांनी कामातील त्रुटी मान्य करण्याऐवजी आंदोलन करणाऱ्या नागरिकांवर गुन्हे दाखल करण्याच्या धमक्या दिल्या. मात्र, या आरोपांवर संबंधित अधिकाऱ्यांची अधिकृत प्रतिक्रिया मिळू शकलेली नाही.
स्थानिक नागरिकांनी तलावातील पाण्याचा तातडीने निचरा करून वाहतूक आणि विद्यार्थ्यांची गैरसोय दूर करण्याची मागणी केली आहे. तसेच कामातील कथित त्रुटींसाठी जबाबदार अधिकाऱ्यांची चौकशी करून आवश्यक ती कठोर कारवाई करण्यात यावी, अशी मागणीही ग्रामस्थांकडून करण्यात आली आहे.
याबाबत नागरिकांनी इशारा देत सांगितले की, तलावातील पाण्याचा लवकरात लवकर निचरा न झाल्यास तीव्र आंदोलन छेडण्यात येईल. तसेच विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक नुकसानीस जबाबदार असलेल्या संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणीही त्यांनी केली आहे.












