ठेकेदारासह दुसऱ्या क्रेन ऑपरेटरविरुद्ध गुन्हा दाखल
जळगाव : पाळधी ते तरसोद बायपासवर दुरुस्तीचे काम सुरू असताना क्रेनसह खाली कोसळून चालकाचा मृत्यू झाल्याची घटना २३ ऑक्टोबर रोजी घडली होती. या प्रकरणी कामात निष्काळजीपणा केल्याच्या आरोपावरून ठेकेदार हरिओम लक्ष्मीनारायण ओझा (रा. इंदूर, मध्यप्रदेश) आणि दुसरा क्रेन ऑपरेटर बन्समनी जानकीप्रसाद प्रजापती यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
क्रेनची रोप वायर तुटल्याने अपघात
मिळालेल्या माहितीनुसार, शहराबाहेरून जाणाऱ्या पाळधी ते तरसोद बायपासवरील रेल्वे पुलाच्या दुरुस्तीचे काम सुरू होते. यावेळी क्रेन चालक मधुकर धनराज पाटील (वय ४३, रा. खपाट, ता. धरणगाव) हे पुलावरील सिमेंट काँक्रीटचा जॉइंट स्लॅब क्रेनच्या साहाय्याने वर उचलून धरत होते. तर पुलाच्या दुसऱ्या बाजूला क्रेन ऑपरेटर बन्समनी जानकीप्रसाद प्रजापती (वय ५२, रा. बुढाडांड, जि. जियावन, मध्यप्रदेश) हा दुसऱ्या क्रेनच्या साहाय्याने स्लॅबला खालच्या बाजूने आधार देत होता.
मात्र, दुसऱ्या क्रेनचा खालचा आधार काढून घेतल्याने मधुकर पाटील हे हाताळत असलेल्या क्रेनची रोप वायर तुटली. त्यामुळे क्रेनसह पाटील हे पुलावरून खाली कोसळले. या भीषण अपघातात त्यांचा मृत्यू झाला.
सुरक्षा साधने न दिल्याचा आरोप
कामाच्या ठिकाणी ठेकेदाराकडून मधुकर पाटील यांना आवश्यक सुरक्षा साधने देण्यात आली नव्हती, तसेच पुलाखाली सुरक्षा जाळी न लावता काम सुरू असल्याचा आरोप फिर्यादीने केला आहे. या प्रकरणी मृत मधुकर पाटील यांचे चुलत भाऊ दीपक वामन पाटील (वय ५०, रा. खपाट, ता. धरणगाव) यांनी पाळधी पोलीस दूरक्षेत्रात फिर्याद दिली.
या फिर्यादीवरून ठेकेदार हरिओम लक्ष्मीनारायण ओझा आणि क्रेन ऑपरेटर बन्समनी जानकीप्रसाद प्रजापती या दोघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेमुळे बांधकामस्थळी कामगारांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे.










