मुंबई -राज्यातला एसटी कर्मचाऱ्यांचा प्रश्न आता आणखी चिघळत चालला आहे. एसटी कर्मचारी संप मागे घेण्यास तयार नाही. एसटीचं राज्य सरकारमध्ये विलिनीकरण व्हावं या मागणीसाठी आता एसटी कर्मचाऱ्यांनी ठिकठिकाणी आंदोलनं करण्यास सुरूवात केली आहे. विरोधी पक्षासह अन्य नेत्यांनीही या आंदोलनाला पाठिंबा दर्शवत सरकारवर दबाव टाकण्यास सुरुवात केली आहे. विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर यांनीही विलिनीकरणाची मागणी लावून धरत या आंदोलनाला पाठिंबा दिला आहे.या मायबाप सरकारला जर कर्मचार्यांची चिंता असेल तर परिवहन मंत्री @advanilparab यांनी आझाद मैदानात येऊन विलिनीकरणाच्या निर्णयाची घोषणा करावी, आम्ही आपले हारतुर्यांनी स्वागत करू. मुख्यमंत्र्यांचे पाय धरायलाही मागेपुढे पाहणार नाही. अन्यथा सरकारला कर्मचार्यांचा तळतळाट भोगावा लागेल.
या आंदोलनाच्या समर्थनार्थ एक व्हिडीओ त्यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरुन शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये दरेकर यांनी एसटी कर्मचाऱ्यांची मागणी मान्य करावी, यासाठी सरकारकडे तगादा लावलेला आहे. या व्हिडीओमध्ये दरेकर म्हणतात, “या मायबाप सरकारला जर कर्मचार्यांची चिंता असेल तर परिवहन मंत्री अनिल परब यांनी आझाद मैदानात येऊन विलिनीकरणाच्या निर्णयाची घोषणा करावी, आम्ही आपले हारतुर्यांनी स्वागत करू. मुख्यमंत्र्यांचे पाय धरायलाही मागेपुढे पाहणार नाही. अन्यथा सरकारला कर्मचार्यांचा तळतळाट भोगावा लागेल .
तर राज्यात एसटी कर्मचाऱ्यांच्या सुरू असलेल्या काम बंद आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर काल मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी संपकरी कर्मचाऱ्यांना आवाहन केले होते. याचबरोबर, संपकरी आंदोलकांना प्रोत्साहन देणाऱ्यांना व विरोधकांवर देखील त्यांनी निशाणा साधला होता. “राजकीय पक्षांनी देखील गरीब एसटी कर्मचाऱ्यांना चिथावणी देऊन, आंदोलनास भाग पाडून त्यांच्या संसारांच्या होळयांवर आपल्या राजकीय पोळ्या भाजू नका अशी माझी त्यांनाही कळकळीची विनंती आहे. ही वेळ राजकारणाची नाही हे लक्षात घ्या.” असं मुख्यमंत्री विरोधकांना उद्देशून म्हणाले होते.












