विजय सपकाळे
कानळदा -जागतिक एड्स दिन व २६/११ मुंबई येथील अतिरेकी हल्ल्यातील शहिद जवानांना आदरांजली म्हणून जळगाव तालुक्यातील कानळदा या गावात समाजिक संघटना व ग्रामस्थांच्या माध्यमातून एचआयव्हीसह जीवन जगणाऱ्या मुलामुलींचा विवाह सोहळा मोठ्या थाटामाटात पार पडला.
या कार्यक्रमाचे उद्घाटन मान्यवरांच्या हस्ते करून कार्यक्रमाला सुरुवात करण्यात आली. त्याप्रसंगी, इनरव्हल क्लब ऑफ जळगाव, ईस्टच्या अध्यक्षा नीता परमार, सचिव बबिता मनधान, पूर्वाध्यक्षा प्रीती जोशी व त्यांच्या सदस्यांनी जोडप्यांना संसारोपयोगी वस्तु व नववधूंना लग्नाचे शालू भेट दिले. वधूवरांना रोटरी क्लब ऑफ जळगाव स्टार्स यांच्याकडून गृहपयोगी वस्तू देण्यात आल्या. वधूवरांना कानळदा येथील शरद सपकाळे यांनी मनीमंगळसूत्र व जोडवे भेट स्वरूपात देऊन कार्यक्रमाची शोभा वाढवली. कार्यक्रमात आलेल्या पाहुण्यांना अन्नदान पंकज चौधरी, उपसरपंच, पिलखेडा व समाधान सपकाळे, सामाजिक कार्यकर्ते यांच्याकडून देण्यात आले. योगराज सपकाळे यांनी विवाह सोहळ्यासाठी आपला कविराज बँड तसेच कार्यक्रमासाठी मंडप आणि डेकोरेशन निखिल चव्हाण यांनी उपलब्ध करून दिला.
या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून श्री. प्रभाकर आप्पा सोनवणे, जि. प. सदस्य, सौ. शीतल कमलाकर पाटील, पं. स. सदस्या, जळगाव, श्री. हर्षलभाऊ चौधरी, पं. स. सदस्य, डॉ. कमलाकर पाटील, माजी सरपंच, फुफनी, श्री. भूषण पवार, सरपंच, नंदगाव, श्री. गोरक्षनाथ सपकाळे, कार्यकारी अभियंता, एमएसईबी, सावदा, श्री. वाडेकर सर, सरपंच, वावडदा, श्री. लाला सर, श्री. भगवान सोनवणे, अध्यक्ष, लहुजी ब्रिगेड आदी मान्यवर उपस्थित होते.
जळगाव येथील शमीभा पाटील, सदस्या, तृतीयपंथीय हक्कांचे संरक्षण व कल्याणकार्य मंडळ, महाराष्ट्र राज्य, नाशिक विभाग यांना यंदाचा एनएमपी प्लस, पुणे यांच्याकडून देण्यात येणारा माणुसकी पुरस्कार व कानळद्याचा सुपुत्र रणजित रविंद्र सपकाळे याने इंडोनेपाळ एशियन रोलर स्केटिंग चॅम्पियनशिप स्पर्धेत गोल्ड मेडल मिळविल्याबद्दल कर्तव्य ग्रूप, कानळदा व युवा ग्रुप, एनएमपी प्लस, पुणे, यांच्याकडून सन्मानचिन्ह देऊन दोघांनाही गौरविण्यात आले.
कार्यक्रमाअंती, सेवानिवृत्त पोलीस उपअधीक्षक, सरपंच, कानळदा, ग्रामपंचायत तथा अध्यक्ष, कर्तव्य ग्रुप कानळदा श्री. पुंडलिक तुळशीराम सपकाळे यांनी सर्व मान्यवरांचे आभार व्यक्त केले.












