सुझलॉनच्या टॉवरमधून केबल चोरणारी टोळी जेरबंद

0
54

तालुक्यातील भोणे व शनिमांडळ शिवारातील सुजलॉन कंपनीच्या टॉवरमधून सुमारे सव्वा दोन लाखांची तांब्याची तार चोरल्याप्रकरणी सुरक्षारक्षकासह १० जणांना अटक करण्यात आली आहे. त्यांच्याकडून १ लाख ५९ हजार ६०० रुपये किंमतीची एकूण ३३७ किलो ग्रॅम तांब्याची तार हस्तगत करण्यात आली आहे. स्थानिक गुन्हा अन्वेषण शाखेच्या पथकाने हे दोन्ही गुन्हे उघडकीस आणले आहेत.

याबाबत अधिक माहिती अशी की, दि. ५ नोव्हेंबर २०२१ रोजी रात्री १० वाजेपुर्वी तालुक्यातील भोणे शिवारातील सुझलॉन टॉवर क्रमांक के-५०१ येथून १ लाख १८ हजार १२५ रुपये किंमतीची ३३७ कि.ग्रॅ. वजनाची एकुण २२५ मिटर व

दि. १ डिसेंबर २०२१ रोजी तालुक्यातील शनिमांडळ शिवारातील सुझलॉन टॉवर क्रमांक के-४१८ मधून १ लाख १० हजार २५० रुपये किमतीची २१० मिटर तांब्याची केबल चोरीला गेल्याने सुझलॉन कंपनीचे सिक्युरिटी मॅनेजर तुकाराम सुकदेव झावरे यांच्या फिर्यादीवरुन अज्ञात आरोपीतांविरुध्द नंदुरबार तालुका पोलीस ठाण्यात दोन चोरीचे गुन्हे दाखल करण्यात आले होते.या गुन्हयाचा समांतर तपास स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक रविंद्र कळमकर यांच्याकडे सोपविण्यात आला होता.दि.७ डिसेंबर २०२१ रोजी पोलीस निरीक्षक रविंद्र कळमकर यांना चाकळे ता.जि. नंदुरबार येथील सागर पाडवी व त्याच्या साथीदारांनी मिळुन भोणे व शनिमांडळ शिवारातील सुझलॉन कंपनीच्या टॉवरवरील केबलमधील तांब्याची तार चोरी करुन ती नवापूर व नंदुरबार शहरातील भंगार घेणार्‍या इसमांना विकल्याची माहिती मिळाली.त्यानुसार श्री.कळमकर यांनी स्थानिक गुन्हे शाखेचे एक पथक तात्काळ चाकळे येथे पाठवुन संशयीतास ताब्यात घेतले. स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने चाकळे ता.जि. नंदुरबार येथे जावुन संशयीत सागर पाडवी याला ताब्यात घेतले.त्याने संदीप सन्या गवळे (वय-२२), विजय गन्सु ठाकरे (वय-२९), भागवत रमण पानपाटील (वय-३०), सन्या गन्सु ठाकरे (वय-३०), श्रावण भाईदास ठाकरे (वय-२८, सर्व रा.चाकळे ता.जि. नंदुरबार) यांच्या मदतीने ७ ते ८ दिवसात भोणे व शनिमांडळ शिवारात असलेल्या सुझलॉन टॉवरवरील केबलमधील तांब्याची तार चोरी केली असल्याचे सांगितले.

यामध्ये सुझलॉन कंपनीचे सुरक्षारक्षक रविद्र देवीदास सोनवणे (वय ३८ वर्षे रा. चाकळे ता.जि. नंदुरबार) हे देखील अंतर्भुत असून त्यांनीच सदर तांब्याची तार चोरी करण्यास सांगितले होते, अशी माहिती सांगितली. याबाबत रविंद्र देवीदास सोनवणे याला ताब्यात चौकशी केली असता सदर तांब्याची तार ही अल्ताफ मिर्झा याच्या मध्यस्थीने नंदुरबार येथील भंगारवाल्यास विकली असल्याचे सांगितले. त्यामुळे अल्ताफबेग मोहम्मद मिझ (वय ४४, वर्षे रा. गाझी नगर, नंदुरबार) यास ताब्यात घेवुन त्याच्याकडे विचारणा केली असता त्याने तांब्याची तार काळ्या मशिद येथील मोहसीन भंगारवाला यास विकल्याचे समजले.

भंगारवाला मोहसिन रहिमोद्दीन शेख वय- ३३ रा. काळी मशिद जवळ नंदुरबार यास ताब्यात घेतले असता त्याने चोरीची तांब्याची तार विकत घेतली असल्याचे कबुल केले. तसेच त्याच्याकडून काही तांब्याची तार हस्तगत करण्यात पोलीसांना यश आले.उर्वरीत तांब्याची तार ही त्याने नवापूर येथील भांड्याच्या व्यापार्‍यास विकल्याचे सांगितले. पथकाने नवापूर येथे जावुन भंगारचा व्यापारी भिकन रज्जाक शहा (वय २९ वर्षे रा.अमनपार्क, नवापूर) यास ताब्यात घेतले. त्याने त्याच्याकडेस असलेली सर्व तांब्याची तार ही पोलीसांना काढुन दिली.अशा रितीने स्थानिक गुन्हे शाखेने नंदुरबार तालुका पोलीस ठाण्यात दाखल असलेले सुझलॉनचे दोन्ही गुन्हे उघडकीस आणून १ लाख ५९ हजार ६०० रुपये किंमतीची एकूण ३३७ किलो ग्रॅम तांब्याची तार हस्तगत केली आहे.आतापर्यंत १० आरोपीना अटक करण्यात आली आहे. अटक करण्यात आलेल्या आरोपिता कडुन आणखी गुन्हे उघडकीस येतील असे मा. पोलीस अधिक्षक पी.आर.पाटील यांनी सांगितले.सदर कामगिरी पोलीस अधिक्षक पी.आर.पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक रविंद्र कळमकर, पोलीस हवालदार महेंद्र नगराळे, जितेंद्र तांबोळी, पुष्पलता जाधव, पोलीस नाईक राकेश मोरे, पोलीस अमंलदार अभय राजपूत, आनंदा मराठे, रामेश्वर चव्हाण, शोएब शेख, रमेश साळुखे यांच्या पथकाने केली

Spread the love